मोहदी ते घोनसरा रस्त्यावर खड्डे
By admin | Published: September 3, 2016 12:39 AM2016-09-03T00:39:38+5:302016-09-03T00:39:38+5:30
सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव अंतर्गत मोहदी ते घोनसरा रस्त्याच्या कामावर अर्धा कोटी रुपयाच्यावर खर्च करण्यात आला.
नागरिक त्रस्त : अपघाताची कायम भीती
महागाव : सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव अंतर्गत मोहदी ते घोनसरा रस्त्याच्या कामावर अर्धा कोटी रुपयाच्यावर खर्च करण्यात आला. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून मोहदी गावातच मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्यातून वाहन नेताना अंदाज न आल्यामुळे कित्येक वाहनाचे नुकसान झाले तर आॅटो सारखे वाहन उलटून बरेच अपघात झाले आहेत.
मोहदी गावाच्या मधोमध या खड्ड्यात साचलेले पाणी आजूबाजूला कमालीची दुर्गंधी पसरवत आहे. त्यामुळे शेजारील नागरिकांना अज्ञात तापाची लागणही झाली आहे. साचलेले पाणी काढून देण्याची संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असूनही खड्डा पडलेल्या ठिकाणी कोणतेच काम करण्यात आले नाही. मोहदीवरून पुढे माळवागद, घोनसरा जायचे असल्यास या खड्ड्याजवळ वाहन थांबवून यातील प्रवासी आधीच खाली उतरवले जातात. पाण्याचा अंदाज घेत वाहन पुढच्या प्रवासाकरिता काढल्या जाते. मोहदी ते घोनसरा रस्त्यांच्या रुंदी करणासह सुधारणा करण्यासाठी ३२ लाख ७९ हजार १७३ रुपये खर्च करण्यात आला आहे. रस्त्याच्या एकूण कामात कोठेही रुंदीकरण आणि सुधारणा झाली नाही. अपवाद वगळता अर्धा कोटी रुपये खर्चून नागरिकांना आपले वाहन मोहदीला ठेवावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)