दारव्हा तालुक्यात ६६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:34+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तालुक्यात ६६ हजार ३०७ हेक्टर सर्वसाधारण, तर ६६ हजार १३५ हेक्टर पेरणीयोग्य शेती क्षेत्र आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यात यावर्षी खरिपात ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्यासाठी क्षी विभागाने नियोजन तयार केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, शेती साहित्य खरेदीसाठी सहकार्य, तसेच मार्गदर्शन केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तालुक्यात ६६ हजार ३०७ हेक्टर सर्वसाधारण, तर ६६ हजार १३५ हेक्टर पेरणीयोग्य शेती क्षेत्र आहे. त्यात कापूस ३१ हजार २५० हेक्टर, ऊस १० हेक्टर, सोयाबीन २५ हजार ३०० हेक्टर, तूर आठ हजार ५०० हेक्टर, मूग ३०५ हेक्टर, उडीद ४०० हेक्टर, ज्वारी ७० हेक्टर, बाजरी आणि मका १० हेक्टर आणि भाजीपाला, फळबाग १३० हेक्टर, याप्रमाणे ६६ हजार १३५ हेक्टरवर पेºयाचा अंदाज आहे.
६६ हजार हेक्टरचे क्षेत्र गृहित धरून तालुका कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभागाने बियाणे, रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत तयारी सुरू केली. यावर्षी कोरोनामुळे कृषी केंद्राची शेतकऱ्यांकडील उधारी बाकी राहिली. परिणामी बियाणे, रासायनिक खतांचे बुकींग कमी झाले. त्यामुळे वेळेत आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आला. जून महिन्याच्या सुरवातीला बियाणे, खतांच्या खरेदीला मोठी गर्दी उसळते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गोंधळ उडू नये, यासाठी अधिकारी कामी लागले आहे. मात्र शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्री, पीक कर्ज यासह अनेक प्रश्न आ वासून उभे आहे.
अद्याप शेतकऱ्यांच्या घरात कापूस, तूर, चना पडून आहे. खासगी बाजारात भाव नाही. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर संथगतीने खरेदी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता नोंदणी केली. मात्र कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तूरीकरिता १00 जणांचा क्रमांक लावला जातो. तसेच कर्जमाफीची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. नियमित कर्जदारांना पीक कर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे मिळण्यास अडचणी आहे. यामुळे बियाणे, खतांच्या खरेदीसाठी वळेवर पैसे न मिळाल्यास पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी बांधव आहे.
रोहिणी नक्षत्र जेमतेम आठवडाभरावर येवून ठेपले आहे. मात्र अनेक शेतकºयांकडे बियाण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहे.
बियाणे, खते बांधावर
कृषी केंद्रात गर्दी होऊ नये म्हणून कृषी विभागाने शेतकरी गटामार्फत बियाणे, खते थेट बांधावर पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. तसेच एका लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. येथील दोन एजंसीच्या सहकार्याने साहित्याची उचल करून बांधावर पोहोचविले. याप्रसंगी बीडीओ राजीव शिंदे, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, नालंदा भरणे, पी.पी. कांबळे, जीवन जाधव, विजयकांत जैवळ, संदीप चव्हाण, प्रेमसिंग राठोड, सुरेश धार्मिक, गणेश अग्रवाल उपस्थित होते.