आरोपीच्या अटकेसाठी अपहृताचे 'शोले स्टाईल' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 05:14 PM2021-11-30T17:14:28+5:302021-11-30T18:47:35+5:30
चंदन हातागडे याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफियांनी त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, ६ महिने लोटूनही आरोपींना अटक झालेली नाही.
यवतमाळ : रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर विवस्त्र करीत मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या गंभीर गुन्ह्यातील सूत्रधार अजूनही पसार आहे. पोलिसांनी त्याच्या अटकेचे प्रयत्नच केले नाही. पैशाच्या जोरावर मस्तवाल रेतीमाफिया प्रशासकीय यंत्रणेला पायदळी तुडवत आहे. या मुख्य आरोपींना अटक व्हावी यासाठी पीडित चंदन हातागडे याने मंगळवारी आंदोलन केले. दर्डानगरातील पाण्याच्या टाकीवर चढून ठोस कारवाई होईपर्यंत उतरणार नाही, असा इशारा दिला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर तो खाली उतरला.
चंदन हातागडे, रा. नेताजीनगर याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफिया सचिन महल्ले, सलीम जाबीर अन्सारी, अमोल तंबाखे रा. नेर यांनी अपहरण केले व त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र सहा महिने लोटूनही प्रमुख आरोपींना अटक झालेली नाही.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याचीही चौकशी योग्यरीत्या होत नाही. मागील सहा महिन्यापासून आरोपी मोकाट आहे. त्यांना एक प्रकारे अभय मिळत असल्याचे दिसते. सराईत व कुख्यात गुन्हेगारांबद्दल पोलिसांची इतकी मवाळ भूमिका सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक ठरणारी आहे, असा आरोप चंदन हातागडे यांनी केला आहे.
कठोर कारवाईसाठी चंदन हातागडे याने दर्डानगर येथील पाण्याच्या टाकीवर ठिय्या आंदोलन केले. याची माहिती मिळताच अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी फोनवरून चंदन हातागडे याच्याशी चर्चा केली. नंतर त्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलणे करून दिले. त्यानंतर चंदन हातागडे याने आंदोलन मागे घेतले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
रेतीमाफियासाठी माजी मंत्र्यांचा दबाव
अपहरण करून मारहाण करणाऱ्या रेतीमाफियांना वाचविण्यासाठी माजी मंत्र्याने पुरेपूर प्रयत्न केले. नेरमधील आरोपीचे नाव रेकॉर्डवर येवू नये यासाठी दबाव टाकला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना अटकच झाली नाही. त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहन, शस्त्रे अजूनही जप्त झालेली नाही. रेतीमाफियांचा मुखिया असलेल्या एकाने आजपर्यंत अनेकांना अपहरण करुन मारहाण केली आहे. त्याचे व्हिडीओही त्याने काढले आहे. मात्र त्याच्या दडपशाहीमुळे कुणीच तक्रार देण्यास पुढे आले नाही. चंदन हातागडे याने तक्रार देण्याची हिंमत दाखविली. मात्र यंत्रणा कारवाई करताना दिसत नाही.