उर्दू शाळेच्या मुलांना मराठी पुस्तकांची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:33 PM2019-04-22T21:33:15+5:302019-04-22T21:34:23+5:30
पुण्या-मुंबईचे लोक मराठीची अवहेलना होत असल्याबद्दल गळे काढत आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ सारख्या जिल्ह्यात मनोभावे मराठीची उपासना केली जात आहे. चक्क उर्दू माध्यमात शिकणाऱ्या मुस्लीम समूदायातील बच्चे कंपनीलाही मराठीची गोडी लागली आहे. त्यातूनच एका शिक्षकाने उर्दू शाळेत मराठी पुस्तकांचे समृद्ध वाचनालय निर्माण केले आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुण्या-मुंबईचे लोक मराठीची अवहेलना होत असल्याबद्दल गळे काढत आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ सारख्या जिल्ह्यात मनोभावे मराठीची उपासना केली जात आहे. चक्क उर्दू माध्यमात शिकणाऱ्या मुस्लीम समूदायातील बच्चे कंपनीलाही मराठीची गोडी लागली आहे. त्यातूनच एका शिक्षकाने उर्दू शाळेत मराठी पुस्तकांचे समृद्ध वाचनालय निर्माण केले आहे.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त एका उर्दू शाळेतील मराठी वाचनालयाची ही कहाणी. दारव्हा तालुक्यातील दुधगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तेथील सर्जनशील शिक्षक अजमत खान यांनी उर्दू माध्यमातून शिकवितानाच विद्यार्थ्यांची मराठीशी नाळ जोडून ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.
या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ८०० मराठी पुस्तकांचे समृद्ध वाचनालय त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर निर्माण केले आहे. डॉ.एपीजे अब्दुल कलाम बालवाचनालय असे नाव देण्यात आले. व्यवस्थापन समितीची मदत झाली. वाचनालये अनेक शाळांमध्ये निर्माण होतात. मात्र तेथील पुस्तके केवळ रेकॉर्डपुरती आणि कपाट बंद असतात. मात्र दुधगावच्या उर्दू शाळेतील मराठी पुस्तके मुले दररोज वाचतात. कुणाचा विश्वास बसणार नाही, मात्र वर्षभरात एका-एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याने तब्बल २५-२५ पुस्तके वाचून पूर्ण केली आहे. केवळ वाचलीच नव्हे तर शिक्षक अजमत खान यांच्या मार्गदर्शनात आस्वादही घेतला आहे. या पुस्तक वाचनावर वाचनालयात नित्य चर्चा घडविली जाते. गडचिरोलीपासून सांगलीपर्यंतच्या शिक्षकांनी हे वाचनालय पाहण्यासाठी दुधगावला भेट दिली.
विद्यार्थीस्नेही रचना
शाळेत केवळ नोंदीपुरती पुस्तके आणण्याचे प्रकार अनेक शाळा करतात. दुधगावच्या शाळेने मात्र वाचनालयासाठी खास कक्ष निर्माण केला. पुस्तके विशिष्ट आकारात भिंतीवर लटकविण्यात आली. या रचनेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक पुस्तकाचे मुखपृष्ठ सहज दिसते आणि कोणत्याही पुस्तकाला हात लावून ते वाचू शकतात. दिल्लीतील शाळेमधील ‘रुम फॉर रिडींग’ बघितल्यानंतर ही रचना केल्याचे खान यांनी सांगितले.
आम्ही उर्दू माध्यमात शिकल्यामुळे पुढे एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ मराठीच्या भीतीपायी उतरु शकलो नाही. ग्रामीण भागातील उर्दू माध्यमातील आमच्या विद्यार्थ्यांचीही अशी अवस्था होऊ नये म्हणून हा उपक्रम सुरू केला. प्राथमिकपासूनच त्यांना मराठी वाचनाची संधी देत आहो. शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लोकवर्गणीतून यश आले.
- अजमत खान, शिक्षक, जिल्हा परिषद उर्दू शाळा, दुधगाव