एसटीचा किलोमीटर भत्ता अजूनही पैशातच, २५ वर्षांपासून वाढ नाही
By विलास गावंडे | Published: March 8, 2024 10:16 PM2024-03-08T22:16:40+5:302024-03-08T22:17:05+5:30
चालक-वाहकांमध्ये नाराजीचा सूर
यवतमाळ: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक-वाहकांच्या किलोमीटर भत्त्यात मागील २५ वर्षांपासून वाढ केलेली नाही. अजूनही या कर्मचाऱ्यांना चलनात नसलेल्या नाण्याच्या रकमेत भत्ता दिला जातो. एसटी प्रशासनाकडून चेष्टा सुरू असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे. या भत्त्यामध्ये वाढ करावी, अशी त्यांची मागणी आहे.
चालक-वाहकांना झालेल्या किलोमीटरनुसार भत्ता दिला जातो. नऊ पैसे, ११ पैसे, १५ पैसे असे या भत्त्याचे स्वरूप आहे. ग्रामीण आणि शहरी भागानुसार भत्त्याचे मूल्य निर्धारित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात बस फेरी झाली असल्यास नऊ पैसे भत्ता देण्यात येतो. अर्थातच २०० किलोमीटर फेरी झाल्यास नऊ पैसेप्रमाणे १८ रुपये किलोमीटर भत्ता मिळतो. या प्रकारातून कर्मचाऱ्यांची थट्टा सुरू आहे.
आज दैनंदिन गरजा वाढलेल्या आहेत. महागाईचा आलेखही खूप वर चढला आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे भत्ते, वेतन वाढले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. परंतु किलोमीटर भत्ता पैशातच दिला जातो. चालक-वाहक मिळून ५० ते ५५ हजार कर्मचारी आहेत. महामंडळाला उत्पन्न आणि प्रवाशांना सेवा देण्यात हा घटक महत्त्वपूर्ण आहे. परंतु त्यांना दिला जाणारा भत्ता चेष्टा करणारा ठरत आहे.
१९९६ च्या करारामध्ये किलोमीटर भत्त्यामध्ये वाढ झाली होती. तिही पैशातच होती. किलोमीटर भत्त्यामध्ये किमान दोन, चार, पाच रुपये यानुसार वाढ व्हावी, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना आहे. आज खेळण्यातही पाच, दहा, २५ पैसे सापडत नाही. पण, एसटी चालक-वाहकांना दिल्या जाणाऱ्या किलोमीटर भत्त्यावर मात्र प्रत्येकवेळी दिसून येते. काही वर्षांपूर्वी रात्र वस्ती भत्ता वाढविण्यात आला. पण किलोमीटर भत्त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. महामंडळ प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना आहे.
किलोमीटर भत्त्याच्या बाबतीत चालक-वाहकांची अवहेलना सुरू आहे. चलनात नसलेल्या नाण्याच्या रकमेत भत्ता देऊन या कर्मचाऱ्यांची चेष्टा केली जात आहे. या भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस