उमरसरात विद्यार्थ्याचा चाकूचे १८ घाव घालून निर्घृण खून
By admin | Published: March 18, 2016 02:35 AM2016-03-18T02:35:21+5:302016-03-18T02:35:21+5:30
वडिलावर चाकूहल्ला केल्याचा सूड उगवित शाळकरी विद्यार्थ्याचा छातीवर चाकूचे १८ घाव घालून निर्घृण खून करण्यात आला.
चौघांंना अटक : पित्यावरील चाकूहल्ल्याचा असाही सूड
यवतमाळ : वडिलावर चाकूहल्ला केल्याचा सूड उगवित शाळकरी विद्यार्थ्याचा छातीवर चाकूचे १८ घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जुना उमरसरा परिसरातील निखिलनगरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
अमन राजेश मिश्रा (१६) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जुना उमरसरा परिसरातील निखिलनगरचा रहिवासी आहे. गोधनी ग्रामपंचायत हद्दीतील बाबाजी दाते टेकडी परिसरात एका निर्जनस्थळी त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने खुनाच्या या घटनेनंतर अवघ्या पाच तासात चार आरोपींना अटक केली. अक्षय राजू सुरळकर (२०), विक्की उर्फ विकास कैलास पवार (२०), योगेश उर्फ गोलू कैलास इंगोले आणि संतोष नामक एका अल्पवयीन मुलाचा त्यात समावेश आहे. हे चारही जण मालाणीनगर उमरसरा येथील रहिवासी आहे. मृतक अमनच्या काकाने दिलेल्या तक्रारीत सहा नावे नमूद करण्यात आली आहे. या खुनात चौघांचा सहभाग आहे की, सहा जणांचा याचा तपास पोलीस करीत आहे. तक्रारीतील अन्य दोघांंनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. आरोपींच्या ताब्यातून पल्सर गाडीही जप्त करण्यात आली. आरोपींना अटक करणाऱ्या पथकात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, पोलीस कर्मचारी बबलू चव्हाण, इकबाल शेख, अरविंद चौधरी यांचा समावेश आहे.
पोलीस सूत्रानुसार, घटनेची हकीकत अशी की, अमन मिश्रा याने दीड महिन्यांपूर्वी अक्षय सुरळकर याच्या वडिलांवर चाकूहल्ला केला होता. त्याची पोलिसात तक्रार नोंदविली गेली नव्हती. परंतु या हल्ल्यामुळे अक्षयच्या मनात अमनविरुद्ध प्रचंड राग होता. या हल्ल्याचा बदला घेण्याची तो संधीची वाट पाहत होता. मंगळवार १५ मार्च रोजी अक्षय, विक्की, योगेश व संतोष हे रात्री एका शाळेच्या मैदान परिसरात बसून असताना अमन तेथे आला. त्याने संतोषला शिवीगाळ सुरू केली. त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सोबतच इतर तिघांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे ते तिघे अमनला घेऊन टेकडी परिसरात गेले. तर अक्षय चाकू आणण्यासाठी घरी गेला. चाकू घेऊन अक्षय ते तिघे गेलेल्या परिसरात गेला. तेथे विक्कीने अमनची नरडी पकडली. तर अन्य दोघांनी त्याचे हातपाय धरले. अक्षयने अमनच्या छातीवर बसून चाकूचे सपासप नऊ घाव मारले. त्यानंतर योगेश, संतोष व विक्कीनेही घाव घातले. अमनच्या शरीरावर चाकूचे १८ घाव घालून त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत टाकून चौघेही पसार झाले.
अमन दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याचा कुटुंबियांनी शोध चालविला होता. अशातच गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. वडगाव रोड पोलिसांनी विशाल मिश्रा यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. अमन हा आई-वडीलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडीलांना असाध्य आजाराने ग्रासले असल्याने ते अंथरूणावर आहे. काका विशाल मिश्रा हे बजरंग दलाचे पदाधिकारी आहेत. (प्रतिनिधी)
मेटीखेड्यातून झाली आरोपींची अटक
अमनचा खून केल्यानंतर चारही आरोपी पल्सर गाडीने फरार झाले. सर्वप्रथम ते अकोलाबाजारनजीकच्या कुऱ्हा तळणी येथे विक्की उर्फ विकास पवार याच्या सासऱ्याकडे गेले. तेथे ते एक दिवस राहिले. मात्र या चौघांनी खून केल्याचे कळताच सासऱ्याने विक्की व त्याच्या साथीदारांंना हाकलून लावले. त्यानंतर ते मोहदा येथे विक्कीच्या मावशीकडे गेले. मोहदा परिसरात बैलांची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे. पल्सर गाडीवरील या चौघांंना पाहून गावकऱ्यांना संशय आला. हे चौघे चोर असावे, असे समजून गावकऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यातच तेथेही खुनाचा कारनामा माहीत पडल्याने मावशीनेही त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर त्यांनी मेटीखेडा-पहूर येथे आणखी एका नातेवाईकाकडे आश्रय घेतला. दरम्यान खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर एसडीपीओ राहुल मदने यांच्या पथकाने चारही संशयितांच्या नातेवाईकांची नावे मिळवून तेथे शोध मोहीम राबविली. अखेर घटना उघडकीस आल्यानंतर पाचच तासांत चार आरोपींना पकडण्यात पोलिसांनी यश मिळविले.