सुरगाव येथील रंगाविना धुलीवंदनाची ज्ञानयज्ञाने सांगता
By admin | Published: March 15, 2017 12:16 AM2017-03-15T00:16:32+5:302017-03-15T00:16:32+5:30
सुरगाव येथे गत २९ वर्षांची परंपरा जोपासत रंगाविना धुलीवंदन साजरे झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ......
तीन दिवस विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम : २० वर्षांची परंपरा जोपासत सुरगावात झाले रंगली धुळवड
सेलू : सुरगाव येथे गत २९ वर्षांची परंपरा जोपासत रंगाविना धुलीवंदन साजरे झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील प्रत्येक ओळीला जीवन मानणाऱ्या सुरगावकरांनी अभिनव धुलीवंदन आणि संतविचार ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी केलेली धडपड यंदाही लोकांनी डोळ्यात साठविली. सतत तीन दिवस चाललेल्या समाजप्रबोधन व विविध सामाजिक कार्यक्रमाची मेजवाणी ग्रामस्थ व पाहुण्यांना तृप्त करून गेली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा समादेशक गृहरक्षक दल मोहन गुजरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेशदादा मांडळे, बा.या. वागदरकर, प्रफुल लुंगे, एम.बी. महाकाळकर, उकेश चंदनखेडे यांची उपस्थिती होती. समारोपीय कार्यक्रम धुलीवंदनाच्या दिवशी झाला. सकाळी गावकरी, महिला, पुरूष व लहान मुले व महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले पाहुणे नाम-धूनमध्ये सहभागी झाले. शिस्तबद्ध व पुरूष, मुलांच्या डोक्यावर भगव्या टोप्या होत्या. नामधून प्रभातफेरीचे एक टोक कार्यक्रमस्थळी पोहोचते तेव्हा शेवटचे टोक गावाच्या शेवटच्या कोपऱ्यात. एवढी प्रचंड नामधून पाहून सर्व उपस्थित पाहुणेही भारावून गेले. गाव दिवाळीसारखे सजले होते. तोरण, पताका, गेट, कमाणी व रांगोळींनी रस्ते फुलून गेले होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक मोहन अग्रवाल तर अतिथी म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आदर्श गाव लेखामेंढा जि. गडचिरोलीचे देवाजी तोफा, अण्णा हजारे यांच्या ट्रस्टचे विश्वस्त डॉ. शिवना कुंभारे गडचिरोली, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर, डॉ. उल्हास जाजू, अनिल नरेडी, ठाणेदार संजय बोंडे, प्रफुल लुंगे, सुबोधदादा अड्याळ टेकडी, भाऊसाहेब थुटे, अवचित सयाम, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, समाजसेवक सुनील बुरांडे, एम.बी. महाकाळकर, बा.दे. हांडे, बा.या. वागदरकर, सुरेशदादा मांडळे, चिन्मय फुटाणे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सप्तखंजेरीवादक प्रवीण महाराज देशमुख यांनी संपूर्ण गावाला राष्ट्रसंताच्या विचाराने एकत्र करीत मोठे परिवर्तन केले. याबद्दल गौरवोद्गार काढत संपूर्ण महाराष्ट्रात रंगाविना धुळवडीच्या उपक्रमात सातत्य ठेवल्याबद्दल कौतुक केले.
प्रास्ताविक लुंंगे यांनी केले. प्रवीण महाराज देशमुख यांच्या वृद्ध आईने आयुष्यभर जमविलेली २० हजारांची रक्कम या उपक्रमाला भेट दिली. स्वत:ची तेरवी व कर्मकांड न करण्याबाबत मनोगत व्यक्त केले. संचालन प्रियंका देशमुख व शुभम मेहता यांनी केले. आभार प्रमुख प्रवीण महाराज देशमुख यांनी मानले. रात्री त्यांच्या सप्तखंजेरी वादनाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने तीन दिवस चालेल्या या ज्ञानयज्ञाचा समारोप करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)