कोलाम पोड्याची 'गावबांधणी', ७२ वर्षांपासून सुरू आहे ही अनोखी प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 04:07 PM2022-06-11T16:07:52+5:302022-06-11T16:32:23+5:30
अख्खी रात्र नाचतो गाव, पाहुण्यांची होते सरबराई, पोडावर संचारतो उत्साह
जोडमोहा (यवतमाळ) : भारतीय संस्कृतीत विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. विविध धर्मीय नागरिक यानिमित्ताने एकत्रित येतात. जिल्ह्यातील कोलाम बांधवांचीही तब्बल ७२ वर्षांपासून एक प्रथा सुरू आहे. तिला गाव बांधणी म्हणून सर्वत्र ओळखले जाते.
तब्बल ७२ वर्षांपासून जिल्ह्यातील कोलाम बांधव आपल्या गावाची अर्थात पोडांची बांधणी करतात. या पोडांवर बाहेरच्या कोणत्याही शक्तीचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून ही परंपरा पाळली | जाते. यानिमित्त गावाच्या वेशीवर गोल रेषा आखली जाते. चारही दिशांना समाजाचे दैवत मांडले जाते. अख्खी रात्र समाज बांधव पारंपारिक नृत्य व गीतांवर थिरकत असतात.
गाव बांधणीचा कार्यक्रम रात्रभर चालतो. पहिल्या दिवशी रात्री ९ वाजतापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत समाज बांधव गाणी गातात. नृत्य करतात. तत्पूर्वी हिरवा मंडप टाकला जातो. रोषणाई केली जाते. त्यात देवी आई-मायची स्थापना केली जाते. पूजाअर्चा केल्यानंतर रात्रभर सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. या कार्यक्रमात तरुणाईसुद्धा रात्रभर विविध गाण्यांवर थिरकतात. त्यातूनही परंपरा जोपासली जाते. देवीच्या पूजेत शिविर कोणतेही विघ्न येवू नये म्हणून सर्वच जण काळजी घेतात.
आषाढ पौर्णिमेपर्यंत चालतो कार्यक्रम
दरवर्षी मे आणि जून महिन्यात कोलाम पोडांची बांधणी केली जाते. १९५० पासून हा उपक्रम सुरू असल्याचे प्रौढ बांधव सांगतात. आषाढ पौर्णिमेपर्यंत गाव बांधणीचा कार्यक्रम सुरू असतो.
मांसाहारी जेवणाची बसते पंगत
गाव बांधणीसाठी पाहुण्यांनाही आमंत्रित केले जाते. त्यांची सरबराई केली जाते. बांधणीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवणाची पंगत असते. यात पाहुण्यांची विशेष काळजी घेतली जाते.
बाहेरून कुणी चप्पल घालून आल्यास दंड
कोलाम पोडांमध्ये नाईक हे प्रमुख असतात. उपप्रमुख म्हणून महाजन जबाबदारी पार पाडतात. या दोघांसह गावातील इतर दोन कार्यकर्ते गाव बांधणी करतात. त्यांच्या नेतृत्वात गावाच्या सभोवताल रेषा ओढून बांधणी केली जाते. हेडंबा देवीची मनोभावे पूजाअर्चना केली जाते. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान गावातून कुणीही बाहेर जात नाही आणि बाहेरून कुणी गावात येत नाही. बाहेरून कुणी चप्पल घालून अथवा वाहनाने गावात आल्यास त्यांना दंड ठोठावला जातो. अत्यंत काटेकोरपणे गाव बांधणीचा कार्यक्रम पार पडतो.
गाव बांधणी म्हणजे देवकारण असते. हिरवा मंडप घालून झेंडा रोवला जातो. देवीची पूजा केली जाते. सभोवताल नाचगाणे चालते. ही परंपरा ७५ वर्षांपासून सुरू आहे.
- लक्ष्मणराव लोणकर, जोडमोहा
गाव बांधणी हा आमचा एकप्रकारे सण असतो. देवीच्या श्रद्धेपोटी हा सण साजरा केला जातो. त्यासाठी गावागावांत मे आणि जून महिन्यात बांधणी केली जाते. परगावातूनही बांधव एकत्र येतात.
- मारोती गोधनकर, जोडमोहा