कोल्हापुरी बंधाऱ्याचा पुलाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:04 AM2019-08-12T00:04:12+5:302019-08-12T00:05:31+5:30
लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.
शाहीद खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने २००२-२००३ मध्ये सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून बोरगाव येथे कोल्हापुरी बंधारा बांधला. २०१२-२०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आला होता. त्यावेळी पुराच्या पाण्याबरोबर आलेली मोठी लाकडे, काडी कचरा, गाळ बंधाऱ्याच्या ओपनिंगमध्ये अडकला. परिणामी ३१ दरवाजांमधून होणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला. महापुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या डाव्या बाजूची जमीन खरडून गेली. यातून नदीचा नवी प्रवाह तयार झाला आहे.
बंधाºयात अडकलेला काडीकचरा तसाच आहे. गाळही साचून आहे. त्यामुळे पाणी सामाजिक वनिकरण विभागाच्या सागवान व बांबूची झाडे असलेल्या नर्सरीत जात आहे. नदीला पूर आल्यास नर्सरीत पाणी शिरत असल्याने वनसंपदेचे व खनिज संपत्तीचे नुकसान होत आहे. खनिज संपत्ती वाहून जात आहे. शेतात पाणी शिरत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. बंधाऱ्यापासून काही अंतरावरच नदीवर पूल आहे. या पुलालाही हादरे बसत आहे. पूल क्षतीग्रस्त होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलाचे नुकसान झाल्यास या मार्गावरील सावळी (सदोबा), पार्डी (नस्कारी), तळणी, कुऱ्हा अशा अनेक गावांबरोबरच ३० ते ४० गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याची भीती आहे. नदीच्या नवीन प्रवाहाने डाव्या बाजूचा नदी काठ खरडत आहे. पुलापर्यंत जमीन खरडत येण्यास थोडे अंतर शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पूल व रस्त्याला धोका होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.
जमीन सामाजिक वनीकरणाची
परिसरातील जमीन सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारित येते. त्यामुळे पूल व रस्त्याची दुरूस्ती करणे शक्य नसल्याचे सिंचन विभागातर्फे सांगितले जाते. दुसरीकडे पूल दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. नदीचा नवा प्रवाह जिल्हा प्रशासनाकडून बेदखल आहे. शासकीय स्तरावर कुणीच दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिक संकटात सापडले आहे. या समस्येची प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पोतगंटवार व परिसरातील गावकºयांनी दिला आहे.