आदिवासी वसतिगृहाचा झाला कोंडवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:01 PM2018-01-29T22:01:57+5:302018-01-29T22:02:31+5:30
वडगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात प्राथमिक सुविधा नाही. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन केले.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : वडगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात प्राथमिक सुविधा नाही. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन केले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले.
वडगाव परिसरात आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. त्यात २५० विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. मात्र अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये त्यांना ठेवले जात आहे. प्रत्येक खोलीत क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी आहेत. ही वास्तू बदलून दुसऱ्या ठिकाणी निवास व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. वसतिगृहातील गाद्या फाटल्या आहे. भोजनाची व्यवस्थाही चांगली नाही. त्यामुळे भोजनाचे कंत्राट बदलण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली. सकस आहार योजनेतून फळ देण्याच्या सूचना असताना केवळ एक केळी दिली जाते. भोजन बनविताना तांदूळ, डाळ, गहू निकृष्ट वापरले जातात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या समस्यांकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी समोवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी सहभागी झाले. डॉ.अरविंद कुडमेथे, पृथ्वीराज पेंदोर, अनिल लडके, दामाजी मेंडके, सूरज कोडापे, ज्ञानेश्वर मडावी, संदेश कुडमेथे, विशाल कुरकुटे, अशोक राजने, अमोल मेश्राम, जगदीश कुंभेकार आदींनी नेतृत्व केले. आंदोलनाची दखल घेत दुपारी पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी एस. भुवनेश्वरी आंदोलनस्थळी पोहोचल्या. त्यांनी सर्व समस्या आठ दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.