कोतवालांच्या आंदोलनाने सरकारी कामे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:23 PM2019-01-01T22:23:21+5:302019-01-01T22:24:14+5:30
कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कोतवाल संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाने शासकीय कामकाज प्रभावित झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कोतवाल संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाने शासकीय कामकाज प्रभावित झाले आहे.
कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, ही मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने सतत डोळेझाक केली आहे. सदर मागणीसाठी संघटनेने यापूर्वी विविध प्रकारची आंदोलने केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे महाराष्ट्र कोतवाल संघटनेने ३१ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. येथील तहसील कार्यालयासमोर पार पडलेल्या या आंदोलनात विजय खांडेकर, गजानन कळसकर, कवडू तायकोटे, आनंदसिंह ठाकूर, प्रेम चव्हाण, रवी कुंभेकर, विजय गवळी, सहदेव गोरेकर, प्रेम गोसावी यांच्यासह ठिकठिकाणचे कोतवाल सहभागी झाले होते.
कळंब येथे तहसीलदारांना निवेदन
कळंब : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोतवालांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करून निवेदन तहसीलदारांना सादर केले. कोतवालांना विनाविलंब चतुर्थ श्रेणी बहाल करण्यासाठी शासनाला कळविण्यात यावे, सेवानिवृत्त आणि दिवंगत कोतवालांच्या अर्धांगिणींना किमान तीन हजार रुपये निर्वाहभत्ता द्यावा, व्यवसाय करापोटी पगारातून कपात केलेले १७५ रुपये परत करण्यात यावे, वेतन दरमहा एक तारखेला देण्यात यावे आदी मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. उपोषणात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष आनंदसिंह बैस, श्रीकृष्ण परचाके, कयाम अली, सुधाकर मडावी, प्रणाली पाटील, किशोर अंबागडे, अशोक खंडाळकर, मनोज पवार, ममता कांबळे, रेणूका उप्पलवार, पौर्णिमा केराम, संजय बावने, कानेश्वर दाभेरे, नरेश नगराळे, जयश्री घावडे, अंकुश कांबळे, कैलास थूल आदी सहभागी झाले होते.