कृष्णा इंगळे यांनी उलगडला बाबासाहेबांचा दुर्मिळ जीवनपट
By admin | Published: April 20, 2017 12:34 AM2017-04-20T00:34:29+5:302017-04-20T00:34:29+5:30
आयुष्यभर वंचितांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या बाबासाहेबांच्या जीवनातील दुर्मिळ प्रसंगांचे हुबेहुब चित्रण
समता पर्व : मोक्याची पदे काबीज करण्याचा संदेश
यवतमाळ : आयुष्यभर वंचितांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या बाबासाहेबांच्या जीवनातील दुर्मिळ प्रसंगांचे हुबेहुब चित्रण कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी येथील समजा पर्वात केले. बाबासाहेबांच्या जीवनातील एक-एक प्रसंग ते सांगत होते, तेव्हा उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
येथील समता पर्व प्रतिष्ठाणतर्फे आयोजित समता पर्वात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रसंग व विचार’ या विषयावर ते बोलत होते. दलित समाज शिक्षीत झाला, उच्चशिक्षीत झाला. परंतु आजही मोक्याच्या पदांवर दलित समाजाची टक्केवारी अत्यल्प आहे. निर्णय घेणाऱ्या आणि माऱ्याच्या जागा अर्थात मोक्याची पदे काबीज करावी, असे बाबासाहेब वारंवार सांगायचे. आयएएस आणि आयपीएस होण्यासाठी त्याकाळी त्यांनी अनेकांना मदत केली. काही जण या पदांपर्यंत पोहोचलेत. परंतु त्यांची आजही टक्केवारी कमी आहे. एकीकडे समाज उच्चशिक्षीत झाल्याचे म्हटले जाते. परंतु दलित समाजातील पीएचडी धारक, डीएम (डॉक्टर आॅफ मेडिसीन) झालेले डॉक्टर अत्यल्प आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनेक शाखा अशा आहेत की, ज्याचा आपण कधीही विचारच करीत नाही. चार-पाच विषयाच्या पलिकडे आपली मुले जात नाहीत. त्यामुळेच आपल्याला मोक्याची पदे मिळविणे कठीण जात आहे. बाबासाहेबांचा संदेश आत्मसात करून माऱ्याच्या जागा मिळविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांनी आयुष्यात लवंग, विलाचीलाही हात लावला नाही. बाबासाहेबांसारखे निर्व्यसनी जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले. ३६ शाखा असणाऱ्या पक्षाची मुळे अद्यापही एकजीव का रूजत नाही, असा आत्मपरीक्षणाचा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रास्ताविक कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, संचालन भरत लढे, किरण मानकर यांनी तर आभार समता पर्वाचे प्रवक्ते राजूदास जाधव यांनी मानले. यावेळी विचारपीठावर डॉ.टी.सी. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, समाज कल्याण अधिकारी मंगला मून, समता पर्व संघटक नामदेव थूल, गटविकास अधिकारी सुभाष मनवर, अंबादास पेंदोर, सचिव जयश्री भगत, अॅड़ रामदास राऊत, कार्याध्यक्ष प्रकाश भस्मे उपस्थित होते.
(नगर प्रतिनिधी)