कुमारीमातांची मुंबईत दखल
By admin | Published: January 14, 2016 03:05 AM2016-01-14T03:05:24+5:302016-01-14T03:05:24+5:30
आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील कुमारीमातांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे.
नीलम गोऱ्हे आज यवतमाळात : पालकमंत्र्यांची आढावा बैठक
यवतमाळ : आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील कुमारीमातांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या मदत व पुनर्वसनाच्या मुद्यावर गुरुवार १४ जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा बैठक बोलविली असून शिवसेनेच्या महिला नेत्या आमदार नीलम गोऱ्हे या बैठकीला विशेषत्वाने उपस्थित राहणार आहे.
आमदार नीलम गोऱ्हे यांनी यापूर्वीही झरी तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन कुमारीमातांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. मात्र त्यानंतर कुमारीमातांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने तेवढे प्रभावी काम होऊ शकले नाही. त्यामुळेच गुरुवारी आमदार नीलम गोऱ्हे स्वत: या बैठकीला उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणा असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.
या कुमारी माता व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी पांढरकवडा तालुक्यात शासनाने काही एकर जागाही निश्चित केली होती. तेथे निवासी बांधकाम करण्याचेही ठरले होते. मात्र केवळ निवास व्यवस्था हे पुनर्वसन नसून त्यांच्या उपजीविका व रोजगाराचे काय असा प्रश्न पुढे आल्याने हे पुनर्वसन काहीसे थंडबस्त्यात पडल्याचे सांगितले जाते.
शेजारच्या तेलंगाणा राज्यातील व्यापारी मिरची शेतीच्या निमित्ताने झरी तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये येतात, चिटुकमिटूक वस्तूंचे आमिष देऊन त्यांचे शोषण केले जाते. नंतर या शोषणकर्त्यांचा थांगपत्ताच लागत नाही. कुमारीमाता पोलिसात तक्रार देणे टाळतात. त्यामुळेच या नराधमांचे फावते आहे. शेतकरी आत्महत्यांप्रमाणेच कुमारीमाता हा सुद्धा शासन-प्रशासनात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येकव् ोळी कोणी तरी कोठून तरी येतो, या कुमारीमातांचे फोटो काढतो, आढावा घेतो, सांत्वन करतो, भेटी देतो मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरी मदत म्हणून काहीच पडत नाही. म्हणूनच या कुमारीमाता आता अशा भेटणाऱ्यांवरही संताप व्यक्त करताना दिसतात. (जिल्हा प्रतिनिधी)
१४१ माता, ४२ मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न
झरी तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये अनेक कुमारीमाता आहेत. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात त्यांची संख्या १४१ तर त्यांच्या मुलांची संख्या ४२ एवढी नोंदविली गेली. सुरुवातीला मदत मिळणार म्हणून कुमारीमातांचा हा आकडा अचानक फुगला होता. रितसर विवाह झालेल्या महिलाही मंगळसूत्र लपवून स्वत:ला कुमारीमाता दाखविण्याचा प्रयत्न करीत होत्या, अशा तक्रारी आहे. मात्र प्रशासनाने त्यानंतर काटेकोर सर्वेक्षण करून कुमारीमातांचा नेमका आकडा निश्चित केला. आजही प्रशासनावर चुकीचे सर्वेक्षण केल्याचा, कुमारीमातांचा ‘वास्तव’ आकडा दडपल्याचा आरोप झरी परिसरातून होताना दिसतो.