तीन वर्षांत सात लाख वृक्षांवर चालली कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:02 PM2019-06-05T22:02:44+5:302019-06-05T22:03:15+5:30
बुधवारी जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सात लाख वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली आहे. किमान आता तरी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बुधवारी जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सात लाख वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली आहे. किमान आता तरी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तीन वर्षांत खासगी मालकांनी जिल्ह्यातील सात लाख वृक्षांची तोड केली आहे. याच्या अधिकृत नोंदी वनविभागाने घेतल्या आहे. ज्या भागात वृक्षतोड करण्याची परवानगी दिली होती, तो भाग आता ओसाड झाला आहे. अशा ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्याचे आदेश वनविभागाने दिले. या ठिकाणी खासगी मालकांना वृक्षारोपण करण्याच्या सूचना आहे. वृक्षारोपण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. २०१५ ते २०१८ या काळात जिल्ह्यात सहा लाख ८३ हजार ८९५ वृक्षांची तोड झाली. हा संपूर्ण भाग आता ओस पडला आहे. या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या. तुटलेल्या वृक्षांच्या ठिकाणी नव्याने सात लाख ८१ हजार ६६७ वृक्ष लावले जाणार आहे. ही वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात वृक्षतोड झाली, तेथे नव्याने वृक्ष लावण्यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार आहे. खासगी मालकांना ते वृक्ष लावायचे आहे. त्याचे संगोपनही करायचे आहे.
४५ अंश तापमानात वृक्षारोपण, लाखोंचा खर्च व्यर्थ
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण केले जात आहे. पाऊस येण्यापूर्वीच हे वृक्षारोपण सुरू झाले. मात्र ४५ अंशाच्या तापमानाने हे वृक्ष करपले आहे. यामुळे वृक्षारोपणावरचा लाखोंचा खर्च वाया जात आहे.यवतमाळच्या धामणगाव मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. यात विविध वृक्षांचा समावेश आहे. यातील काही झाडे मोठी, तर काही छोटी आहेत. यातील छोटे वृक्ष उन्ह सहन न झाल्याने करपण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीच हे वृक्ष प्राण सोडणार काय, अशी स्थिती आहे. वृक्ष लागवड हा चांगला उपक्रम आहे. मात्र त्याच्या अवेळी लागवडीने फलित साध्य होणार नाही. यातून चांगल्या उद्देशावरच पाणी फेरले जाणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कामावर कोणाचेही लक्ष नाही. यामुळे आश्चर्य आहे.
पुन्हा कंत्राट मिळविण्यासाठी...
अवेळी वृक्षारोपण करायचे. मग हे झाडे वाळले म्हणून नव्याने त्याच ठिकाणी वृक्षारोपण करायचे. त्यासाठी नवीन कंत्राट मिळवायचे, यासाठीच अवेळी झाडे लावल्या गेली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतर ठिकाणचे वृक्षारोपण थांबवून पाऊस आल्यानंतरच वृक्ष लावण्याची परवानगी द्यावी, असे मत वृक्षप्रेमी व्यक्त करीत आहेत.
खासगी मालकांनी वृक्ष लागवड न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. वृक्ष लागवड बंधनकारक आहे. तसे नियोजनही तयार झाले आहे.
- भाऊराव राठोड, विभागीय वन अधिकारी