कुरई येथे मुलाने केला जन्मदात्याचा खून
By admin | Published: July 30, 2016 12:55 AM2016-07-30T00:55:19+5:302016-07-30T00:55:19+5:30
घरगुती कारणावरून झालेल्या वादात मुलाने केलेल्या मारहाणीत वडील मृत्युमुखी पडल्याची घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुरई गावात घडली.
घरगुती कारण : १० दिवसांनी उलगडले रहस्य
वणी : घरगुती कारणावरून झालेल्या वादात मुलाने केलेल्या मारहाणीत वडील मृत्युमुखी पडल्याची घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुरई गावात घडली. गुरूवारी रात्री या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.
कवडू राजुरकर (५२) असे मृताचे नाव आहे. १८ जुलै रोजी कवडू राजुरकर याला जखमी अवस्थेत त्याचा मुलगा गणेश राजुरकर याने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. माझे वडिल शेताकडे जात असताना दारूच्या नशेत दगडावर पडून जखमी झाले व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार गणेशने वणी पोलिसांकडे केली होती. वणी पोलिसांनी हे प्रकरण चौैकशीसाठी शिरपूर पोलिसांकडे सोपविले.
चौैकशीदरम्यान, कवडूचा मृत्यू डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीने झाला, असा वैद्यकीय अहवाल शिरपूर पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर शिरपूरला नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यासह जमादार अशोक इंगोले, जमादार शंकर राजगडकर, शिपाई योगेश ढाले यांनी कुरई येथे जाऊन या प्रकरणाची सखोल चौैकशी केली असता, सत्य उजेडात आले. घटनेच्या दिवशी कवडू राजुरकर व त्याचा मुलगा गणेश या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. या वादात गणेशने कवडूला काठीने बेदम मारहाण केली. त्यात कवडूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गणेश राजुरकर याच्याविरुद्ध भादंवि ३०२, २०१, २०३ अन्वये गुन्हा दाखल करून गुरूवारी रात्री त्याला अटक केली. (कार्यालय प्रतिनिधी)