ऐन निवडणुकीत वाढले मजुरांचे स्थलांतर; मतदानावर परिणाम होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:36 PM2024-11-19T17:36:54+5:302024-11-19T17:47:04+5:30
Yavatmal : रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : २० नोव्हेंबर रोजी पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांचे दुसऱ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. यामुळे रिंगणातील उमेदवारांसह प्रशासनासमोर मजुरांचे स्थलांतर रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून, मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुसद तालुका हा मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. स्थानिक रोजगार उपलब्ध नसल्याने तालुक्यातील अनेक गावातील कामगार, मजुरांना आपल्या बालकांसह पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यांत व परराज्यांत कामांच्या शोधात जावे लागते. हे दुष्टचक्र सुटणार तरी कधी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दुसरीकडे या प्रकारामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चिंता वाढली असून मतदारांना गावातच कसे थांबवून ठेवायचे याचे आव्हान आहे. पुसद तालुका म्हटले की, बहुतांश भाग हा शेतमजुरांचा ओळखला जातो. या भागातून बेरोजगार, गरीब, गरजू, मजूर, अल्पभूधारक शेतकरी व नागरिकांचे जत्थेच्या जत्थे परराज्यात व परजिल्ह्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी जातात.
पुसद तालुक्यात एमआयडीसीमध्ये नावाला एकही उद्योग सुरू नाही. तसेच येथे लघुऔद्योगिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी अनेकांनी अत्यल्प दराने लिजवर भूखंड घेऊन ठेवले आहे. मात्र या भूखंडधारकांनी एकही उद्योग सुरू केलेला नाही. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना प्लॉट उपलब्ध नसल्याने ते उद्योग सुरू शकत नाहीत. ज्यांनी या क्षेत्रातील प्लॉट अडवून ठेवले अशांवर संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. उद्योगाच्या नावाखाली अनेकजण प्लॉट बळकावून बसले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रोजगारासाठी परजिल्ह्यासह राज्यात धाव
तालुक्यातील अनेक जण, छत्तीसगड, आंध्र प्रदेश किंवा राज्यातील नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी महानगरात कामे शोधायला जातात. याब- रोबरच ऊसतोडणीसाठीही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर राज्याबाहेर तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये जात असल्याने उमेदवारांनी धसका घेतला आहे.