पुसद उपवनसंरक्षकांच्या बंगल्यावर राबताहेत मजूर
By admin | Published: August 9, 2015 12:09 AM2015-08-09T00:09:41+5:302015-08-09T00:09:41+5:30
वनमजुरांना वनेत्तर कामात गुंतवू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही वन अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यावर वन मजुरांना राबविले जात असल्याचा...
पुसद : वनमजुरांना वनेत्तर कामात गुंतवू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही वन अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यावर वन मजुरांना राबविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील उपवनसंरक्षकांच्या बंगल्यात राबणाऱ्या मजुरांना ‘लोकमत’च्या कॅमेराने टिपले.
अखिल भारतीय वन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात सुमारे एकर भराचा बंगला असतो. या बंगल्याच्या देखभाल, साफसफाई व घरगुती कामांसाठी वन मजूर वापरण्याचा प्रघात वन खात्यात पडला आहे. वन मजुराने जंगलात काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेकांना साहेबांच्या बंगल्यावरच राबावे लागते. आधीच वन कर्मचारी अपुरे असताना उपलब्ध कर्मचाऱ्यांना जंगल संरक्षण सोडून बंगल्यावर, वन कार्यालयात लिपीकवर्गीय कामासाठी वापरले जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. म्हणून शासनाने वन मजुराचा वनेत्तर कामासाठी वापर करण्यास मनाई करणारा आदेश जारी केला. त्यानंतर आयएफएसच्या बंगल्यातून या मजुरांना बाहेर काढून जंगलात पाठविण्यात आले. परंतु आता पुन्हा मजूर बंगल्यात वापरण्याचे प्रकार सुरू झाले आहे. पुसद येथील उपवनसंरक्षकांच्या बंगल्यात झाडपूस करताना मजुरांना शनिवारी ८ आॅगस्ट रोजी दुपारी टिपण्यात आले. या बंगल्यात नामदेव, गजानन व भाऊ हे तीन वनमजूर कार्यरत आहेत. त्यांना दिवसभर बंगल्यावरच ड्युटी द्यावी लागते. झाडपूसपासून सर्वच कामे करावी लागतात. वारंवार मागणी करूनही त्यांना पुसद वन क्षेत्रात प्रत्यक्ष जंगल संरक्षणाची ड्युटी दिली गेलेली नाही. पुसद डीएफओ बंगल्यातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला. असाच प्रकार अन्य आयएफएस, एसीएफ, आरएफओ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बंगल्यांमध्ये रोपवाटिका आहेत. त्याच्या देखभालीसाठी वनमजूर लागतात. याच वन मजुरांना रोपवाटिकेआड बंगल्यातील अन्य कामांसाठी वापरले जात असल्याची माहिती आहे. विशेष असे वन मजूर बंगल्यावर वापरले जात असल्याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावेळी बंगल्यावर एकही वनमजूर कामावर नाही, सर्वांना प्रत्यक्ष जंगल संरक्षणाच्या कामात नेमले गेले, अशी शासनाला सादर केली गेली होती, हे विशेष. मात्र प्रत्यक्षात वन मजूर अद्यापही राबत असल्याचे पुसद डीएफओच्या बंगल्यात सिद्ध झाले आहे. डीएफओ सारखा जबाबदार अधिकारी शासनाचे आदेश डावलून आपल्या बंगल्यात वन मजुरांना राबवीत असल्याचे पाहून त्यांच्या अधिनस्त काही एसीएफ, आरएफओंकडूनही या प्रकाराची पुनरावृत्ती केली जात असल्याचे सांगितले जाते. डीएफओ १२ आॅगस्टपर्यंत प्रशिक्षणाला गेले आहेत. त्यानंतरही वनमजूर बंगल्यावर कायम आहेत.