पुसदमध्ये नागरी सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:01+5:30
शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. येथील लक्ष्मीनारायण नगरी प्रभाग क्रमांक १४ हे १९९७ मध्ये अस्तित्वात आले. या नगरात जवळपास शंभरावर घरे आहे. चारशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. मात्र नागरिक सांडपाण्याच्या नाल्या, नळयोजना, टेलिफोन, पथदिवे आदी नागरी सुविधांपासून वंचित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील नगरपरिषदेचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालिकेचा व्यापही वाढला. मात्र बोरगडी भागालगतच्या लक्ष्मीनारायण नगरात रस्ते, पाणी, नाल्या, नळयोजना, पथदिवे आदी नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील १0 वर्षे मालमत्ता कर न भरता थेट न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. येथील लक्ष्मीनारायण नगरी प्रभाग क्रमांक १४ हे १९९७ मध्ये अस्तित्वात आले. या नगरात जवळपास शंभरावर घरे आहे. चारशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. मात्र नागरिक सांडपाण्याच्या नाल्या, नळयोजना, टेलिफोन, पथदिवे आदी नागरी सुविधांपासून वंचित आहे. याबाबत नागरिकांनी नगराध्यक्ष अनिताताई मनोहर नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्यासह नगरसेवक संतोष दरणे, ताई पाटील व गादेवार आदींना वारंवार निवेदन दिले. मात्र आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडले नाही.
या नगराकडे नगरपरिषद प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. आता नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यातून त्यांनी पुढील १0 वर्षे मालमत्ता कर न भरण्याचा इशारा दिला. तसेच न्यायालयात याचिका दाखल करून नगराध्यक्षांच्या कक्षाला कुलूप ठोकण्याचाही इशारा दिला.
या निवेदनामुळे एकच खळबळ उडाली आहे. निवेदनावर उमेश इंगळे, योगेश दिवेकर, शरद कांबळे, अजाबराव उघडे, भाऊ माहूरे, किसन भुरके, भाऊ पठारे, भाऊ पानपट्टे, कुंडलिक दळवी, गजानन गाडबैले, प्रकाश ठमके आदींच्या स्वाक्षºया आहेत.
इतर भागातही सुविधांचा बोजवारा
लक्ष्मीनारायणनगराप्रमाणेच शहरातील काही प्रभागात सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक भागातील रस्ते दयनीय स्थितीत आहे. शहरातून जाणारे मुख्य मार्गही खड्डेयुक्त झाले आहे. काही परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त आहे. पालिकेने नुकताच आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यातून शहर विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.