तेराव्या यादीवरच अडली कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:37 PM2018-12-16T22:37:40+5:302018-12-16T22:38:21+5:30
कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकºयांची नावे आलेली नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. यामुळे कर्ज न मिळालेल्या शेतकºयांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली. ही प्रक्रिया राबविताना आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आॅनलाईन प्रक्रियेत नाव नोंदविताना अनेक अडचणी आल्या. सादर झालेल्या नावांमध्ये असंख्य त्रृटी असल्याची बाब मध्यंतरी पुढे आली. यावर दुरुस्ती करण्याचे काम मुंबईच्या आयटी विभागाकडे सोपविण्यात आले होते. या कालावधीत आयटी विभागाला आग लागली. तेव्हापासून ग्रीन लिस्ट प्रसिद्ध होण्याची गती मंदावली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयटी विभागाच्या प्रमुखांना त्या ठिकाणावरून हटविले. यानंतरही कामकाजाची गती वाढलेली नाही.
यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया बँक स्तरावर अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाल्या. यामध्ये एक लाख ९६ हजार ७७३ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले. १२७६ कोटी त्यांच्या खात्यात वळते करण्यात आले. मात्र अद्यापही एक लाख शेतकऱ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली नाहीत. यामध्ये नावांमध्ये त्रृटी असणे, आयएफएससी कोड चुकणे, खाते क्रमांक आणि ओटीएसचे प्रकरण याबाबींचा समावेश आहे. कर्जमाफीतील कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांनी थांबविली आहे. आता नव्याने ग्रीन लिस्ट लागण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
प्रत्यक्षात पेरणीचा हंगाम संपला. यामुळे नवीन ग्रीन लिस्ट लागली नाही, असे बोलले जाते. आता पुढील वर्षीच नावे येतील का, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आधीच खासगी सावकारांकडून पेरणीसाठी तजवीज करणारे शेतकरी यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. दुष्काळाने त्यामध्ये भर घातली आहे.
योजना दीड लाखाची, माफी ६९ हजारांचीच कशी?
जिल्ह्यात बँकांनी कर्जमाफी योजना राबविताना काही चुकाही केल्या. याचा फटका शेतकºयांना बसला. दीड लाखापर्यंत कर्जमाफी असतानाही निम्मेच पैसे माफ करण्यात आले. आता अशा शेतकºयांना नव्याने कर्जही मिळाले नाही. हे शेतकरी बँकांच्या वारंवार येरझारा मारत आहेत. त्यांना प्रतीक्षा करा, असे सांगितले जात आहे. लाडखेड सेंट्रल बँकेतील विजय गुल्हाने या शेतकऱ्याने एक लाख १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांचे ६९ हजार रुपयांचेच कर्ज माफ झाले. यामुळे त्यांना नव्याने कर्जही मिळाले नाही. हा शेतकरी बँकेच्या येरझारा मारत आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील इतरही राष्ट्रीयीकृत बँकांत घडला आहे. यावर अद्यापही पर्याय निघालेला नाही. यामुळे अर्धवट कर्जमाफी झाल्याचा आरोप जिल्ह्यातील वंचित शेतकºयांकडून होत आहे.