पुसद उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:51+5:302021-04-17T04:40:51+5:30

अखिलेश अग्रवाल पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. मान्यता १०० बेडची असताना, प्रत्यक्षात ५० बेड आहे. ...

Lack of facilities in Pusad sub-district hospital | पुसद उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव

पुसद उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव

Next

अखिलेश अग्रवाल

पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. मान्यता १०० बेडची असताना, प्रत्यक्षात ५० बेड आहे. स्त्री रुग्णालयासाठी मागणी होत असताना, शासन दरबारी खर्च करून मंजुरात मिळविण्याचे लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होत नाही.

येथे एकेका खासगी दवाखान्यात दररोज हजारोंची उलाढाल होते, परंतु गरीब रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, येथील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तेच नको होते. खासगी व्यावसायिकांचा येथे दबदबा होता व आजही आहे.

उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला येतात. दररोज १२ ते १३ प्रसूती होतात. त्यामुळे नवीन स्त्री रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. सध्या कर्मचारी कमी आहे. अपुर्‍या मनुष्यबळावर उपजिल्हा रुग्णालय चालणार कसे, असा प्रश्न आहे. नवीन स्त्री रुग्णालय व्हावे, यासाठी कुणीच गांभीर्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यास तयार नाही.

उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनची नितांत गरज आहे. गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात सिटी स्कॅन करून घेणे शक्य नाही. एक्स-रे फोटोग्राफी मशीन आहे, पण ती धूळखात आहे. त्याचा उपयोग केल्यास खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर चालणार नाही, म्हणून मशीन तशीच ठेवलेली दिसते. इमारतीचे फाउंडेशन कच्चे आहे. बेसिक फाउंडेशन भविष्याचा विचार न करता तयार केले. त्यावर मजले बांधले जाऊ शकत नाही, असे जाणकारांचे मत आहे.

येथील ओपीडी सेंटर केवळ दोन ते तीन डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे. तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, औषधीसाठा शून्य आहे. औषधी नाही, तर रुग्णांवर उपचार कसे करणार, असा प्रश्न आहे. दवाखान्यात एमबीबीएस डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली, पण ते हजर राहात नाही. प्रसूतीच्या वेळी सिझरची गरज पडल्यास खासगी डॉक्टर्स बोलावतात. त्याचा भुर्दंड गरीब रुग्णांना सोसावा लागतो.

रक्त साठविण्याची स्टोअरेजची व्यवस्था नाही. रक्तवाढीचे इंजेक्शनही नाही. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष येथील आमदार डॉ.वजाहत मिर्झा आहेत. दुसरे आमदार इंद्रनील नाईक सदस्य आहेत. येथे ॲड.नीलय नाईक हे तिसरे आमदार आहे. या सर्वांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालय राम भरोसे सुरू आहे.

बॉक्स

नर्सिंग कॉलेजचे भिजत घोंगडे

येथील नर्सिंग कॉलेजचेही भिजत घोंगडे पडले आहे. नर्सिंग कॉलेजसाठी सात कोटी मंजूर आहे. त्यातील चार कोटी ५० लाख रुपये जमा झाल्याचे समजते, परंतु त्यासाठी जागा उपलब्ध नाही. सूतगिरणी परिसरात शासनाच्या मालकीची जमीन आहे. तेथे नर्सिंग कॉलेज होऊ शकते. मात्र, त्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती पाहिजे. कॉलेजसाठी जमीन शासनाकडून मिळावी, म्हणून मागणी करण्यात आली. आंदोलन झाले, पण लोकप्रतिनिधींना घाम फुटत नाही.

कोट

उपजिल्हा रुग्णालयात इन्फ्रास्ट्रक्चर आहे, परंतु मॅन पॉवरची कमतरता आहे. या संदर्भात आमदार इंद्रनील नाईक यांच्यासह मी पाठपुरावा केला. सध्या कोविडमुळे आरोग्य यंत्रणा व्यस्त आहे. हा स्ट्रेन कमी झाल्यानंतर, या कामी दोघेही प्रयत्न करणार आहोत.

डॉ.वजाहत मिर्झा, आमदार, विधान परिषद तथा अध्यक्ष वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

Web Title: Lack of facilities in Pusad sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.