‘वखार’च्या गोदामाला रस्त्याचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:17 PM2018-07-02T22:17:35+5:302018-07-02T22:17:55+5:30
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात. आता पावसाळ्यात तर या ठिकाणी जाणे कठीण झाले आहे. परिणामी ट्रकमधील शेकडो पोते धान्य ओले होण्याची भीती आहे.
यावर्षी नाफेडमार्फत जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने अनेक ठिकाणी खासगी गोदाम वखार महामंडळाने अधिग्रहित केले. उमरखेड येथील सरोज भराडे यांच्या मालकीचे गोदाम २२ मे रोजी अधिग्रहित करण्यात आले. या गोदामाची स्थळ पाहणी उमरखेड तहसीलदारांमार्फत करण्यात आली. त्यावेळी गोदाम मालकाने मुख्य रस्त्यापासून गोदामापर्यंत जाण्यास रस्ता नाही. त्यामुळे अधिग्रहण करू नये, असे पत्र दिले. परंतु वखार महामंडळाने याकडे दुर्लक्ष करीत गोदाम ताब्यात घेतले.
यवतमाळ जिल्ह्यात खरेदी केलेली तूर आणि हरभरा येथील गोदामात आणला जात आहे. मुकुटबन, घाटंजी, राळेगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस, आर्णी आदी ठिकाणावरून ट्रक धान्य घेऊन येतात. परंतु या गोदामापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही.
गोदामापर्यंत मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून धान्य घेऊन आलेले ट्रक चिखलात फसले. पाऊस सुरू असल्याने ट्रकमधील धान्य खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत शंकरशीला अॅग्रो वेअर हाऊसच्या संचालक सरोज भंडारी म्हणाले, वखार महामंडळाला या गोदामासाठी अर्धवट रस्ता असल्याचे कळविले. तरीही जबरदस्तीने गोदाम अधिग्रहित करण्यात आले. पावसाळ्यात होणाऱ्या धान्याच्या नुकसानीस आपण जबाबदार राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गोदामामध्ये नाफेडने खरेदी केलेला धान्य माल टाकण्यात येणार आहे. त्याला मुख्य रस्त्यापासून गोदामापर्यंत रस्ता नसल्याचे आणि गोदाम शेतात असल्याचे उमरखेड तहसीलदार, एसडीओ, वखार महामंडळ व नाफेडला कळविले आहे.
- ए.एन. डावरे
स्टोअर किपर वखार महामंडळ, उमरखेड