कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव
By admin | Published: May 20, 2017 02:37 AM2017-05-20T02:37:18+5:302017-05-20T02:37:18+5:30
महागावच्या कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असून कृषी सहायकांची दहा पदे रिक्त आहे.
शेतकरी हैराण : कृषी सहायकांची दहा पदे रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गुंज : महागावच्या कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असून कृषी सहायकांची दहा पदे रिक्त आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी हैराण झाले आहे. कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहे.
शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध योजना तालुका कृषी कार्यालयातून दिल्या जातात. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती सांगितली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून या कार्यालयात कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचणे कठीण झाले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर गाडा सुरू आहे. यासोबतच काळी दौ., फुलसावंगी, महागाव येथील मंडळ कार्यालयातही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. तालुक्यात २७ कृषी सहायकांची आवश्यकता आहे. परंतु सतराच कृषी सहायक येथे कार्यरत आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी सहायक मिळत नाही. शेतकऱ्यांचे कोणतेही काम होत नाही. परिणामी तालुक्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांच्याशी संपर्क साधला असता कर्मचारी कमी असून याबाबत वरिष्ठांकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु अद्याप कर्मचारी मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप तोंडावर
मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये होताच शेतकरी उत्साहीत झाले आहे. खरिपाच्या तयारीला लागले आहे. मात्र महागाव कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना कृषी विभाग खरिपात कसे मार्गदर्शन करणार, असा प्रश्न आहे.