लाॅकडाऊन नावालाच, बारमध्ये रात्री उशिरापर्यंत ‘झिंगाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 03:20 PM2021-01-19T15:20:38+5:302021-01-19T15:22:28+5:30
Yawatmal news यवतमाळ शहरातील दारू दुकाने, बीअर बार काेणतेही निर्बंध नसल्यासारखी सुरू आहेत. त्याच्यावर काेणाचाच ‘वाॅच’ नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील दारू दुकाने, बीअर बार काेणतेही निर्बंध नसल्यासारखी सुरू आहेत. त्याच्यावर काेणाचाच ‘वाॅच’ नाही. कायदे केवळ कागदावर असतात याची प्रचिती येथे आल्यानंतर येते. रात्री उशिरापर्यंत शटर टाकून आतमध्ये खुलेआम मद्यपान सुरू राहते. हा प्रकार सर्वश्रुत असूनही आतापर्यंत एकही कारवाई करण्यात आली नाही. स्थानिक पाेलीस व एक्साईजची यंत्रणा कधीच याकडे फिरकत नाही.
काेराेनाचा प्रकाेप अद्यापही कायम आहे. त्यामुळे लाॅकडाऊन ३० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. त्यानंतरही या आदेशाची काेणीच अंमलबजावणी हाेताना दिसत नाही. बीअर बार, हाॅटेलमध्ये रात्री ९ नंतर गर्दी जमायला सुरुवात हाेते. रात्री उशिराचे टेबल विशेष करून आरक्षित ठेवले जातात. ते पटकाविणाऱ्यांसाठी प्रत्येक बारमध्ये छुपा रस्ता आहे. बाहेरून शटर बंद असले तरी आतमध्ये सर्वच सुविधा पुरविली जाते. दारव्हा राेड, आर्णी राेडवर रात्री उशिरानंतर बंद बारबाहेर वाहने लागलेली दिसतात. बाहेरच दार बंद ठेवून यशावकाश पहाटेपर्यंत बार-हाॅटेलमधून सेवा दिली जाते. तेथून झिंगत बाहेर पडणाऱ्यांवरही मध्यरात्रीनंतर काेणतीच कारवाई हाेत नाही. या प्रकारामुळे रात्रीचे अपघातही वाढले आहेत. अनेक जण शहरापासून दहा-बारा किलाेमीटर अंतरावर असलेल्या हाॅटेल-धाब्यावर एकांत शाेधायला जातात. तेथून यथेच्छ मद्यपान करून परत येताना वाहनावरचे नियंत्रण सुटून अनेक अपघात झाले आहेत. उज्ज्वलनगर येथील चार युवकांचा अशाच पद्धतीने अपघाती मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी मद्यपान करून येत असलेल्या कारने चक्क काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार डाॅ. वजाहत मिर्झा यांच्या वाहनाला धडक दिली. अशा एक ना अनेक घटना सातत्याने घडत असतात. त्याला केवळ रात्री उशिरापर्यंत चालणारी मद्यालये कारणीभूत ठरत आहेत.