बोगीच्या दारात ‘लॅडर’ बसवा, मृत्यूला परत पाठवा! दहावीच्या विद्यार्थ्याने शोधला उपाय
By अविनाश साबापुरे | Published: September 1, 2023 11:43 AM2023-09-01T11:43:37+5:302023-09-01T11:45:07+5:30
गाडी आणि फलाटातील अंतर बुजविणारी ऑटोमॅटिक पायरी : जर्मनीकडून पेटंट
अविनाश साबापुरे
यवतमाळ : रेल्वेत चढताना किंवा उतरताना अनेक प्रवासी घसरून पडतात, रेल्वे आणि फलाटामधील ‘गॅप’मध्ये पडून त्यांचा चिरडून मृत्यू होतो. परंतु, आता यवतमाळच्या दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधला आहे. रेल्वेचे दार आणि फलाटातील अंतर ‘बुजविणारी’ ऑटोमॅटिक पायरी त्याने तयार केली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या या संशोधनाला जर्मनीचे पेटेंटही मिळाले आहे.
‘एक्स्टेंडेबल स्टेप लॅडर सिस्टिम’ असे त्याच्या या संशोधनाचे नाव आहे. तर समृद्ध राजू रामेकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळचे यवतमाळ येथील व आता अदिलाबाद येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध रेडिओलाॅजिस्ट डाॅ. राजू रामेकर यांचा तो मुलगा आहे. सध्या तो दहाव्या वर्गात शिकत आहे. रेल्वे आणि रेल्वे फलाट यामध्ये थोडे अंतर असते. याच अंतरात अनेक जण फसून मृत्युमुखी पडतात. रेल्वे फलाटावर थांबण्यापूर्वीच अनेक जण उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. त्यात घात होतो. तसेच काही वृद्ध, दिव्यांग बांधव रेल्वेतून उतरताना त्यांचा तोल जातो. अशा घटनांमधील मृत्यू रोखण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणारे आहे.
‘लॅडर’ असे वाचवते जीव
समृद्ध रामेकर याने तयार केलेले स्टेप लॅडर म्हणजे एक प्रकारची ऑटोमॅटिक उघडणारी आणि बंद होणारी शिडी किंवा पायरीच आहे. रेल्वेच्या दारात ती बसविली जाईल. दारावर भार पडताच ती चटकन उघडली जाईल. रेल्वे आणि फलाटावरील ‘गॅप’च्या वर ती येईल. म्हणजे मधल्या अंतरात माणूस पडण्यापासून वाचेल. शिवाय, थोड्या वेळानंतर ही शिडी आपोआप हळूहळू बंद होऊन पूर्ववत होईल. तसेच नवीन प्रकारच्या वंदेभारतसारख्या इलेक्ट्रिक रेल्वेमध्ये तर ही शिडी दार उघडताच उघडेल आणि दार बंद होताच बंदही होईल.
वर्षाला होतात अडीचशे मृत्यू
या संशोधनाबाबत समृद्ध रामेकर म्हणाला की, मी परिवारासोबत गावाला जात असताना रेल्वेतून पडून दगावलेली व्यक्ती पाहिली. नाहक मृत्यू ओढवणारी ही घटना केवळ रेल्वे व फलाटातील अंतरामुळे घडते, असे मला वाटले. त्यामुळे ही ‘गॅप’ भरून काढणारे असे काहीतरी डिव्हाइस तयार करण्याचा विचार केला. त्यातूनच ‘एक्स्टेंडेबल स्टेप लॅडर’ तयार झाले. मला याचे पेटेंट मिळाले आहे, मात्र भारतीय रेल्वेने याचा वापर करावा, एवढीच इच्छा आहे. कारण भारतात अशा प्रकारच्या अपघातात वर्षाला सुमारे २५० प्रवाशांचा मृत्यू होतो.