लाडखेड ठाणेदार रॉकेल माफियांच्या दावणीला
By admin | Published: April 5, 2017 12:13 AM2017-04-05T00:13:31+5:302017-04-05T00:13:31+5:30
दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रणधीर हे रॉकेल माफियांच्या दावणीला बांधलेले असल्याचे वार्ताहरावरील हल्ला प्रकरणाने सिद्ध झाले आहे.
वार्ताहरावरील हल्लेखोर फिरतोय मोकाट :
‘तडजोडी’साठी सूट, शिवसैनिक दलालाच्या भूमिकेत
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रणधीर हे रॉकेल माफियांच्या दावणीला बांधलेले असल्याचे वार्ताहरावरील हल्ला प्रकरणाने सिद्ध झाले आहे. हल्लेखोराला तत्काळ अटक करण्याऐवजी रणधीर केवळ देखावा निर्माण करीत आहे. तर दुसरीकडे या हल्लेखोराला ‘तडजोडी’साठी लाडखेड पोलीसच नव्हे तर संपूर्ण जिल्हा पोलीस दलाची सूट मिळाल्याने हा हल्लेखोर मंगळवारी सायंकाळपर्यंत यवतमाळात उघडपणे फिरताना दिसला. विशेष असे रामनवमी बंदोबस्ताच्या निमित्ताने सर्व पोलीस रस्त्यावर असताना हा फरार आरोपी पोलिसांसमोरून येरझारा मारत होता.
नेर मार्गावरील सोनखास येथील ‘लोकमत’चे वार्ताहर पांडुरंग भोयर यांच्यावर सोमवारी सकाळी बातमी छापल्याचा राग मनात धरुन मुरलीधर ठाकरे याने गावातच हल्ला केला. सर्वांसमक्ष त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. भोयर यांनी तत्काळ लाडखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार भादंविच्या कलमांसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. दुपारी २ वाजतापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आरोपी मुरलीधर ठाकरे याला लाडखेड पोलिसांकडून तत्काळ अटक होणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी त्याला फरार होण्यासाठी पुरेपूर सूट दिली. अटकेचा देखावा निर्माण करण्यासाठी लाडखेड पोलिसांची गाडी तेवढी त्याच्या घरापर्यंत जाऊन आली.
या प्रकरणात लाडखेड पोलिसांनी ‘मोठी उलाढाल’ केल्याचे सांगितले जाते. कारण सोनखास गावातील रॉकेल माफियांच्या दावणीला खुद्द लाडखेड ठाणेदार नरेश रणधीर बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आरोपी मुरलीधर ठाकरे याला अटक करण्याची तसदी घेतली नाही. एवढेच नव्हे तर त्याला शक्य असेल तर २४ तासांत फिर्यादीला बाहेरच मॅनेज करून ‘तडजोड’ करण्याचा सल्ला दिला. ठाणेदाराच्या सल्ल्यानुसार आरोपी मुरलीधर ठाकरे याने आपल्या नेर मार्गावरीलच एका पंडित नामक शिवसैनिकाला (?) ढाल बनविले. वार्ताहरावर हल्ला झाला असताना तोही तत्काळ दलालाची भूमिका वठविण्यात तयार झाला. या शिवसैनिकाच्या माध्यमातून मुरलीधर ठाकरे सकाळपासूनच ‘तडजोडी’साठी प्रयत्न करू लागला. त्यासाठी शिवसैनिक, आरोपी ठाकरे व त्याचे साथीदार दिवसभर यवतमाळात होते. त्यांनी फिर्यादी पांडुरंग भोयर यांच्या पुढेही नांग्या टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भोयर यांनी त्याला भीक घातली नाही. राम नवमी बंदोबस्ताचे कारण पुढे करून ठाणेदार नरेश रणधीर आरोपींना ‘तडजोडी’साठी पुरेशी सवलत देत असल्याचे स्पष्ट आहे. रणधीर यापूर्वी यवतमाळ शहर व वडगाव रोड पोलीस ठाण्यालाही कार्यरत होते. तेथेही त्यांची कारकीर्द अशीच वादग्रस्त ठरली. तक्रार न घेणे, ती घेतल्यास तीव्रता दडपणे, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींना अभय देणे यात रणधीर यांचा हातखंडा असल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते.
आरोपी मुरलीधरला अटक केल्यानंतर तत्काळ जामीन मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘सकारात्मक’ कागदपत्रे तयार करण्याचा शब्दही पोलिसांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्या आरोपीला अटक होऊन तत्काळ जामीन मिळाल्यास नवल ठरू नये. किमान अॅट्रॉसिटी हटविता यावा यासाठी फरार (?) आरोपी आणि त्या शिवसैनिकाने लाडखेड पोलिसांच्या माध्यमातून जोरदार मोेर्चेबांधणी चालविली आहे. वार्ताहरावरील हल्लेखोराला नेर तालुक्यातील शिवसैनिकाने पाठबळ देण्याचा प्रकार पाहता ही शिवसेनेची अधिकृत भूमिका तर नव्हे ना अशी शंकाही ‘माध्यमां’मध्ये व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘एसपीं’च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
यवतमाळात नव्यानेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हे कर्तव्यदक्ष असल्याचे त्यांचे अधिनस्त ठाणेदार, कर्मचारी सांगतात. मात्र वार्ताहरावरील हल्ला प्रकरणात त्यांची ही कर्तव्यदक्षता कुठेही दिसून आली नाही. हल्लेखोराला अटक का झाली नाही, याबाबत एसपी, अॅडीशनल एसपी, एसडीपीओ, एलसीबी पीआय यांच्याकडून ठाणेदाराला विचारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी ती तसदी घेतली नाही. ते पाहता ठाणेदाराने आरोपीला ‘तडजोडी’साठी दिलेल्या सूट-सवलतीला पोलीस प्रशासनाचेही पाठबळ नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे.