पोहरादेवी सेवाध्वज स्थापनेला पोहोचले लाखो समाजबांधव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:39 PM2023-02-14T13:39:25+5:302023-02-14T13:44:32+5:30
तीर्थस्थळावरून जाणार रेल्वे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
यवतमाळ : बंजारा समाजबांधवांची काशी असलेल्या पोहरादेवी येथे सेवाध्वज स्थापनेसाठी लाखो समाजबांधव पोहोचले. या सोहळ्याला आपण उपस्थित राहावे यासाठी यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि देशभरातील बंजारा बांधव रविवारी, १२ फेब्रुवारीला एकत्र आले होते. या सोहळ्यात अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली. पोहरादेवी हे श्रद्धास्थान आता रेल्वे मार्गाने जोडले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
संत सेवालाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या पोहरादेवीला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. देशभरातील बंजारा समाजाचे हे श्रद्धास्थान आहे. तेथील विकासासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्रीगण यांच्या उपस्थितीत सेवाध्वज व सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना मोठ्या थाटात करण्यात आली. यावेळी परंपरागत वेशभूषेत बंजारा समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ठिकाणी १३५ फूट उंचीचा सेवाध्वज आणि २१ फूट उंचीचा सेवालाल महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. शिवाय नंगारा भवनाचेही लोकार्पण झाले. बंजारा समाजाच्या समस्या पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजासाठी नंगारा बोर्ड स्थापन करून ५० कोटींचा निधी दिला जाईल, तांडा वस्ती सुधार योजनेला भरीव आर्थिक तरतूद केली जाईल. मुंबईत बंजारा भवन स्थापन केले जाईल, याशिवाय समाजासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या २८ मागण्याही तातडीने पूर्ण केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, महंत बाबूसिंग महाराज, आमदार नीलय नाईक, आमदार राजेंद्र पाटणी, माजी मंत्री अमरसिंग तिलावत, खासदार उमेश जाधव, कबीरदास महाराज, शेख महाराज, जितेंद्र महाराज, यशवंत महाराज, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाध्यक्ष पराग पिंगळे, उद्योजक याेगेश चव्हाण, संजय महाराज, संजय भानावत, रूपेश जाधव, सुंदरसिंग महाराज, बद्या नायक, लोक्या नायक, जगन्नाथ नायक, अमोल राठोड आदी उपस्थित होते. या सोहळ्यात संपूर्ण देशभरातील बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते.