गीताई केंद्रावर भूमाफियांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:05 PM2018-01-13T22:05:09+5:302018-01-13T22:05:24+5:30
वाशिम रोडवरील गीताई केंद्रावर भूमाफीयांनी हल्ला करून सेवकांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : वाशिम रोडवरील गीताई केंद्रावर भूमाफीयांनी हल्ला करून सेवकांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
वाशिम मार्गावर शिवाजी शाळेलगत विठाबाई मारोतराव ट्रस्टतर्फे गीताई सेवा केंद्राच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य सुरू आहे. मातोश्री विठाबाई मारोतराव वानखेडे यांनी सदर १.४१ हेक्टर जागा आचार्य विनोबा भावे यांच्या गीताई केंद्राला १९७८ मध्ये दान दिली आहे. सध्या या परिसरात संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ म्हसकर, मॅनेजिंग ट्रस्टी नारायणराव सांगोलकर, वृंदाताई जाधव, संदीप जाधव वास्तव्याला आहे. या परिसरातील काही जमीन शेतीसाठी आरक्षित आहे. सोमवारी रामकृष्ण वानखेडे, राजेश मल्हारी साळुंखे व सुभाष बापुराव पाध्ये हे इतर ३० ते ४० जणांसह तेथे पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टरमध्ये फावडे, सिमेंट खांब, दगड, लोखंडी रॉड आदी साहित्य आणून बळजबरीने परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला संदीप जाधव, रामभाऊ म्हसकर आणि अॅड.ज्ञानेंद्र कुशवाह यांनी विरोध केला. मात्र हल्लेखोरांनी संदीप जाधवला मारहाण करून गीताई केंद्रामध्ये स्वत:च्या मालकीचा फलक लावला. जवळपास दीड तास हा प्रकार सुरू होता. यावेळी काही पोलीसही तेथे उपस्थित होते. मात्र त्यांनी हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी रामभाऊ म्हसकर यांनी त्याच दिवशी पोलिसात तक्रार दिली. मात्र वसंतनगर पोलिसांनी ती एनसीमध्ये ठेवली. संदीप जाधव यांची तक्रार दोन दिवस घेतलीच नाही. नंतर ती १० जानेवारीला स्वीकारण्यात आली. मात्र तीसुद्धा अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात आली.
गेल्या ४० वर्षांपासून ही जागा संस्थेच्या नावाने आहे. सरकारी दस्तवेजात ती संस्थेच्या मालकीची आहे. ट्रस्टकडे पुरावे असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप म्हसकर, कुशवाह, जाधव यांनी केला.
गीताई परिसर हा समाजाची विरासत आहे. आमच्यावर अन्याय होत असून अतिक्रमण हटवावे. न्यायालयाचा आणि कोणताही आधार नसताना ट्रस्टच्या नावे मालकीच्या जागेत कुठेही पाटी लावून बळजबरीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- रामभाऊ म्हसकर
अध्यक्ष,
विठाबाई मारोतराव ट्रस्ट पुसद
गीताई केंद्रात घुसून हल्लेखोर जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकशाही जागृत न झाल्यास दहशत निर्माण करणाºयांची हिम्मत वाढेल.
- नारायणराव सांगोलकर
मॅनेजिंग डायरेक्टर,गीताई केंद्र, पुसद