परिस्थितीमुळे शिकू न शकलेल्या शेतमजुराने शाळेला दिली जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:00 AM2021-10-10T05:00:00+5:302021-10-10T05:00:22+5:30
परशराम वाढई यांनी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान दिली. परशुराम परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत; परंतु अनुभवाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले. गावातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा, या उदात्त हेतूने त्यांनी शाळेला जमीन दान देण्याची इच्छा मुख्याध्यापक अशोक सिंगेवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या सभेत बोलून दाखविली होती.
विठ्ठल कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : मोलमजुरी करून त्यांनी स्वकष्टाने सात एकर शेतजमीन घेतली. त्यांपैकी दोन एकर शेतजमीन शाळेला दान देऊन त्यांनी समाजापुढे दातृत्वाचा आदर्श ठेवला.
तालुक्यातील वाढोणा खु. येथील या घटनेने सर्वांनाच दातृत्वाचा परिचय झाला. गावात जिल्हा परिषद शाळा आहे. याच शाळेला सामान्य शेतकऱ्याने दोन एकर शेती दान देऊन समाजात अद्यापही दातृत्व कायम असल्याचे दाखवून दिले.
परशराम वाढई यांनी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान दिली. परशुराम परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत; परंतु अनुभवाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले. गावातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा, या उदात्त हेतूने त्यांनी शाळेला जमीन दान देण्याची इच्छा मुख्याध्यापक अशोक सिंगेवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या सभेत बोलून दाखविली होती.
त्यानुसार मुख्याध्यापकांनी त्यांची भेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, बीईओ प्रवीण कांबळे व दीपिका गुल्हाने यांच्याशी घालून दिली. त्यांनी जमीन शाळेच्या नावे करून घेण्यास परवानगी मिळविली. त्यासाठी लागणारे पैसे शिक्षक वसंत मोहुर्ले, अनिल म्हस्के, प्रशांत भेदुरकर, प्रवीण मडावी, मुकेश पसावत, अश्विनी पावडे यांनी गोळा केले. शेवटी परशुरामजींचे स्वप्न पूर्ण झाले आणि ३० सप्टेंबर रोजी शेत सर्व्हे गट नं. १३३ मधील दोन एकर जमीन नोंदणी कार्यालयातून शाळेच्या नावे करून दिली. या दातृत्वाची सर्वत्र चर्चा आहे.
चार मुलीनंतर शाळा हेच माझे पाचवे अपत्य : वाढई
- दुसऱ्यांच्या शेतात सालगडी राहून आणि काबाडकष्ट करून परशराम वाढई यांनी स्वकष्टाने सात एकर जमीन घेतली. त्यांतील दोन एकर शेती शाळेला दान दिली. या कार्यात त्यांची पत्नी सावित्राबाई वाढई आणि शोभा प्रधान, बेबी लेनगुरे, दुर्गा चोधरी, माला चौधरी या चार विवाहित मुलींनी त्यांना प्रोत्साहन दिले. चार मुलींनंतरही पाचवे अपत्य ही माझी शाळा आहे, अशी भावना परशराम यांनी व्यक्त केली. या शाळेत मुले शिकतील, मोठे होतील, ते पाहून मी धन्य व तृप्त होईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यात ईकलाक खान, सरपंच वेणुताई कोटनाके, उपसरपंच उत्तम शेंडे, माजी सरपंच बळिराम ऊइके, पोलीस पाटील अण्णा भेंडाळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम खान, संतोष गुरनुले, मोतीराम मोहुुर्ले, सुनील चौधरी, रामदास पवार, गुरुदेव प्रधान यांनी पुढाकार घेतला.