बेवारस भूखंडांवर भूमाफियांची वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:07 PM2018-07-09T22:07:46+5:302018-07-09T22:08:14+5:30
शहर व परिसरातील बेवारस भूखंडांवर स्थानिक भूमाफियांनी वक्रदृष्टी फिरविली असून अनेक भूखंड गिळंकृत केले. दुय्यम निबंधक कार्यालयातून खातरजमा केल्यास अनेकांचा ‘आपणच भूखंडांचे मालक आहोत’, या भ्रमाचा भोपळा फुटण्यास वेळ लागणार नाही.
राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर व परिसरातील बेवारस भूखंडांवर स्थानिक भूमाफियांनी वक्रदृष्टी फिरविली असून अनेक भूखंड गिळंकृत केले. दुय्यम निबंधक कार्यालयातून खातरजमा केल्यास अनेकांचा ‘आपणच भूखंडांचे मालक आहोत’, या भ्रमाचा भोपळा फुटण्यास वेळ लागणार नाही. पोलिसांनीही या टोळीच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे.
बेवारस भूखंड, शेती हडपणारी टोळी यवतमाळात सक्रिय आहे. राकेश हा या टोळीचा म्होरक्या आहेत. कुणी यवतमाळात भूखंड घेऊन ठेवला असेल आणि तो मालक बाहेरगावी राहत असेल, असे प्लॉट दलालांच्या मदतीने हेरले गेले. या प्लॉटचे बनावट मालक उभे करून तर काही प्रकरणात बनावट खरेदीदारही उभे करून व्यवहार झाले. बोगस पद्धतीने खरेदी-विक्री झालेले हे भूखंड बँकांमध्ये तारण ठेऊन कोट्यवधींचे कर्ज उचलले गेले आहे. काही प्रकरणात बँका अंधारात राहिल्या तर कुठे बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केली. बँका मात्र या व्यवहारात आर्थिक अडचणीत आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यात दोन डझनापेक्षा अधिक मोठ्या भूखंडांची अशापद्धतीने या भूमाफियांनी विल्हेवाट लावली आहे. कोट्यवधींच्या या व्यवहारात प्रॉपर्टी ब्रोकर, अर्जनवीस, दुय्यम निबंधक कार्यालय, महसूल विभाग, व्हॅल्युअर, सर्च रिपोर्ट देणारे, गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य, बँकांची यंत्रणा अशा अनेकांची साखळी आहे. या साखळीतील बहुतांश घटकांची नावे उघड झाली आहे. लवकरच या सर्वांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. फारसी खातरजमा न करता व मूळ किंमत न तपासता कोट्यवधींचे कर्ज वाटणाºया बँकांचाही यात पोलिसांकडून पर्दाफाश केला जाणार आहे. अशा बेवारस प्रॉपर्टीवर आणि या व्यवहारांवर एक अर्जनवीस सातत्याने अनेक महिन्यांपासून ‘प्रकाश’ टाकत असल्याचेही सांगितले जाते. या प्रकरणात सर्च रिपोर्ट देणारे, किंमत वाढवून देणारे ‘तज्ज्ञ’ व्हॅल्युअरसुद्धा अडचणीत येणार आहेत.
विदर्भ हाऊसिंग परिसर
४सुमारे दोन वर्षांपूर्वी विदर्भ हाऊसिंग भागातील पाच असेच बेवारस भूखंड परस्पर हडपले होते. या प्रकरणात वडगाव रोड ठाण्यात चार जणांना अटक करण्यात आली होती. शासकीय कर्मचारी व पोलीस बंगल्याची साफसफाई करणाºया स्वीपरच्या भावाला अटक करण्यात आली होती. बाहेरगावी राहणाºयांचे आधार कार्ड, राशन कार्ड व अन्य कागदपत्रे बनावट तयार करून हे प्लॉट विकले गेले होते. त्यातील तीन प्लॉट यातील सूत्रधाराने स्वत: ठेवले तर दोन विकले.
संदीप टॉकीज परिसर
बेवारस प्लॉट विक्री व्यवसायातील म्होरक्या राकेश याने संदीप टॉकीज परिसरात असाच एक कारनामा केला आहे. चार ते पाच दुकाने बँकेत गहाण ठेऊन कर्ज उचलले, तेथील यंत्रणेला हाताशी धरुन बँकेतून या संपत्तीची कागदपत्रेच गहाळ केली गेली. नंतर ही दुकाने एका नामांकित दुध विक्रेत्याला विकली. फेरफारच्या वेळी हा गैरप्रकार पुढे आला. विशेष असे या प्रॉपर्टीबाबत बँक आणि तो दूध विक्रेता यांचा वाद सुरू असताना राकेशने पुन्हा तिसºयाकडून पैसे घेतले. पैसे देण्याची तयारी दर्शविल्याने त्या दूध विक्रेत्याने पोलिसात तक्रार केली नसल्याचे सांगितले जाते. राकेशचे यवतमाळ शहरात असे अनेक कारनामे असून सध्या तो चार ते पाच कोटी रुपये घेऊन पसार असल्याचे सांगितले जाते.