अंत्योदय योजनेपासून भूमिहीन वंचित
By admin | Published: August 9, 2014 01:26 AM2014-08-09T01:26:16+5:302014-08-09T01:26:16+5:30
नजीकच्या कुर्ली येथील भूमिहीन रोजमजुरांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवून त्याऐवजी सधन लोकांना योजनेचा लाभ मिळत असल्याची तक्रार वंचित लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे़
शिंदोला : नजीकच्या कुर्ली येथील भूमिहीन रोजमजुरांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवून त्याऐवजी सधन लोकांना योजनेचा लाभ मिळत असल्याची तक्रार वंचित लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे़
कुर्ली येथील शेतमजूर धनराज सुभे, रामचंद्र परचाके यांचे २०१३ च्या सर्वेक्षणानुसार बीपीएल यादीमध्ये नाव होते़ नियमानुसार ते नाव अंत्योदय योजनेत समाविष्ट होणे गरजेचे होते़ परंतु सदर नावे अंत्योदय योजनेतून राजकीय सुडापोटी वगळण्यात आल्याचा आरोप वंचित लाभार्थ्यांनी केला आहे़ धनराज सुभे, रामचंद्र परचाके यांनी संबंधितांकडे वारंवार केलेल्या मागणीनुसार ग्रामपंचायत कुर्ली येथे २६ जानेवारी १४ च्या ग्रामसभेत त्यांची नावे अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला़ परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांची नावे योजनेत समाविष्ट झाली नाही़ सुभे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश ५ मार्च २०१४ ला दिले होते़ मात्र त्यावरही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही़ अद्याप वंचितांची नावे यादीत समाविष्ट झाली नाही़
केंद्र शासनाने देशातील दारिद्र्य रेषेखाली अल्पभूधारक, भूमिहीन, दीनदुबळ्या नागरिकांच्या पोटाची खळगी भरता यावी, यासाठी रास्तभाव दुकानातून धान्य पुरवठा करण्याच्या उद्देशाने अंत्योदय, दारिद्र्य रेषेखालील योजना सुरू केल्या़ मात्र या योजनेचा लाभ खोटे लाभार्थी घेत असून अनेक खऱ्या लाभार्थ्यांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सोसूनही लाभ मिळत नाही़ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी यादीची चौकशी करून श्रीमंत लोकांची नावे वगळून खऱ्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करावी, अशी मागणी आहे़ (वार्ताहर)