आंबेझरी जंगल बनले जनावर तस्करांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 08:43 PM2019-04-12T20:43:19+5:302019-04-12T20:45:18+5:30

ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

Langar | आंबेझरी जंगल बनले जनावर तस्करांचा अड्डा

आंबेझरी जंगल बनले जनावर तस्करांचा अड्डा

Next
ठळक मुद्देपोलिसांपुढे आव्हान : हिंगणघाटवरून हलतात तस्करीची सूत्रे, पिक-अप वाहनांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या तस्करीचे मुख्य सूत्रधार हिंगणघाटमध्ये असून तेथूनच सर्व सूत्रे हलत असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.
पाणी व चारा टंचाईमुळे गोपालक अल्प किमतीत आपली जनावरे तस्करांच्या हवाली करत आहेत. हिंगणघाट तालुक्यात हा व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती आहे. खरेदी केलेली जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा व आंध्रप्रदेशात नेली जात आहे. त्यासाठी तस्करांनी आंबेझरीच्या जंगलाची निवड केली आहे. वणी उपविभागासह हिंगणघाट परिसरातून आणलेली जनावरे सर्वप्रथम आंबेझरीच्या जंगलात उतरविली जातात. या तस्करीत हिंगणघाट येथील आठ तस्करांचा सहभाग असल्याची माहिती आहे.
आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरविल्यानंतर ती जनावरे पायदळ जंगल मार्गाने निमणी, दाभाडी, मांडवा, माथार्जुन, दिग्रसमार्गे तेलंगणा, अदिलाबादकडे नेली जात आहे. यासोबतच पांढरकवडा तालुक्यातील बोरगाव जंगलाच्या पठारावरदेखिल दर रविवारी ही जनावरे उतरविली जात असल्याची माहिती सदर जाणकाराने दिली. तेथून ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा, अदिलाबादकडे रवाना करण्यात येत आहे. तसेच जनावरांची निर्यात करण्यासाठी पिक-अप वाहनांचाही वापर करण्यात येत आहे. जवळपास १० पिक-अप वाहनातूनदेखिल जनावरांची तस्करी केली जात आहे.
या तस्करीत मारेगाव येथील आसिफ, तस्लीम, पाटणबोरीतील शागीर, पांढरकवडातील कलीम, कळंब येथील आरिफ, शकीर, तस्लीम यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे सोमवार आणि मंगळवारी तस्करीवर अधिक जोर असतो. या तस्करीत दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी आंध्रात जात असले तरी पोलिसांच्या कारवाया मात्र शून्य असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने तस्करीवर टाच आली होती. परंतु अलिकडील काही दिवसात तस्करांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. केवळ ट्रकने जाणाऱ्या जनावरांवरच पोलिसांची नजर असते. नेमका या गोष्टीचा फायदा घेऊनच तस्करांनी जंगल मार्गाने पायदळ जनावरे नेण्याचा फंडा अवलंबला आहे.
वन कर्मचारीच बनले खबरे
या तस्करांनी काही वन कर्मचाऱ्यांना चिरीमीरी देऊन आपले खबरे बनविल्याची चर्चा आहे. जनावरे कोणत्याही मार्गाने सुरक्षित पोहोचतील, याबाबत हे कर्मचारीच या तस्करांना मार्गदर्शन करीत असल्याने तस्करांचा मार्ग सुकर बनला आहे. सहकार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना तस्करांकडून मोठी बिदागी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Langar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.