तरुणाला ट्रकने चिरडल्याने लासिनात चक्काजाम
By Admin | Published: March 8, 2015 02:02 AM2015-03-08T02:02:45+5:302015-03-08T02:02:45+5:30
घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.
नेर/सोनखास : घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चक्काजाम करून आठ ट्रकची तोडफोड केली. तर, अपघातानंतर पळून जाताना ट्रकने येलगुंडा येथे पाच गार्इंनाही चिरडून ठार केले. लासिना येथे तब्बल तीन तास चक्काजाम करण्यात आला.
अभय गौतम सोनोने (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. अभयचे घर यवतमाळ-अमरावती राज्यमार्गालगत आहे. शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास तो घराच्या अंगणात उभा होता. त्यावेळी चंद्रपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.३४/७९६१) निंबाच्या झाडाला धडक देत अंगणात शिरून अभयला चिरडले. यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी ट्रकचा पाठलाग केला. मात्र ट्रकचालक ट्रक घेऊन पळून गेला. ट्रक भरधाव वेगाने जात असताना नेरजवळील येलगुंडा येथे रस्त्यावरून जाणाऱ्या पाच गार्इंना चिरडले. गणेश राठोड, सुभाष राठोड, विष्णू राठोड, नीळकंठ महानोर यांच्या मालकीच्या त्या गाई होत्या. या घटनेची माहिती नेर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गणेश भावसार, जमादार हरिशचंद्र कार, राजेश चौधरी, महेश तडसे, राजेश भगत, जीवन राठोड, अशोक चव्हाण यांनी हा ट्रक मोठ्या प्रयत्नाने अडवून ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रकचालक मोहमद अनिस रा.कोपा जि. प्रतापगड (मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.
तर लासिना येथे संतप्त नागरिकांनी चक्काजाम सुरू केला. या ठिकाणी थांबलेल्या आठ ते नऊ ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या. तर काही वाहनातील हवा सोडून दिली. यामुळे लासिना येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिक लासिना येथे गतिरोधक देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते. अपघातानंतर दीड तासपर्यंत लाडखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते.
त्यानंतर काही पोलीस कर्मचारी घटनास्थळावर आले. तर यवतमाळ येथून वाहतूक शाखा आणि दंगल नियंत्रण पथक लासिना येथे पोहचले. तरुणाला चिरडणारा ट्रक हा चढ्ढा कंपनीचा असून संतप्त नागरिकांना याच कंपनीच्या ट्रकला लक्ष करीत त्यांच्या काचा फोडल्यात. दरम्यान, बांधकाम विभागाचे एम.आर. राठी यांनी गावकऱ्यांना सोमवारपर्यंत गतिरोधक बांधून देण्याचे आश्वासन दिल्याने चक्काजाम मागे घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
(तालुका प्रतिनिधी)