अंत्यविधीनंतर आंघाेळीसाठी नदीत मारलेली उडी ठरली शेवटचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:48 AM2021-08-17T04:48:09+5:302021-08-17T04:48:09+5:30
मार्डी : मित्राच्या मृत्यूचे वृत्त कळल्यानंतर त्याने अंत्यविधीसाठी धाव घेतली. अत्यंत शोकाकुल वातावरणात हा अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आंघोळीसाठी ...
मार्डी : मित्राच्या मृत्यूचे वृत्त कळल्यानंतर त्याने अंत्यविधीसाठी धाव घेतली. अत्यंत शोकाकुल वातावरणात हा अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आंघोळीसाठी दांडगाव लगतच्या वर्धा नदीत आंघोळीसाठी त्याने उडी मारली. मात्र, ही उडी शेवटचीच ठरली. खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दांडगाव येथे घडली. प्रवीण ऊर्फ पंढरी भाऊराव चिंचोलकर (वय ३८) असे मृताचे नाव आहे. दांडगाव येथे एकापाठोपाठ आणखी एक मृत्यू पाण्यात बुडून झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
१३ ऑगस्टला दांडगाव येथील प्रफुल्ल मते या युवकाने वर्धा नदीवरील मारडा बंधाऱ्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा अंत्यविधी १४ ऑगस्टला सायंकाळी ५ च्या सुमारास दांडगाव लगतच्या वर्धा नदीकिनारी पार पडला. या अंत्यविधीसाठी मृत प्रफुल्लचा मित्र प्रवीण चिंचोलकर आला होता. अंत्यविधी पार पडल्यानंतर काहीजण आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. त्यात प्रवीणसुद्धा होता. मात्र, प्रवीणला नदीतील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे आंघोळीसाठी उतरल्यानंतर तो गटांगळ्या खाऊ लागला. तेथे उपस्थित ग्रामस्थांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत प्रवीणचा शोध घेण्यात आला. त्यानंतर अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. या घटनेची माहिती गोरजचे पोलीस पाटील प्रमोद ताजने यांनी पोलीस स्टेशन कळविली. प्रवीणच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.