शरद पवारांशी अखेरची बोलणीही ठरली व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:38 PM2019-07-29T21:38:20+5:302019-07-29T21:38:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक पक्ष सोडणार असल्याची कुणकुण लागताच जिल्हाध्यक्ष आमदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक पक्ष सोडणार असल्याची कुणकुण लागताच जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी पुसदच्या बंगल्यावर धाव घेऊन अखेरची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नाईकांचे थेट शरद पवारांशी बोलणेही करून दिले. मात्र नाईक शिवसेना प्रवेशाच्या निर्धारावर ठाम राहिले.
मनोहरराव नाईक पक्ष सोडणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून होती. भाजपमध्ये जाऊन निलय नाईकांना चेकमेट देणार की शिवसेनेत जाणार याबाबतचे तर्क लावले जात होते. मात्र गेल्या आठवड्यात मनोहरराव नाईकांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्धार पक्का झाला. शिवसेनेत प्रवेश करण्याचेही ठरले. त्या अनुषंगाने ‘मातोश्री’वर मुलगा इंद्रनील यांनी भेटी-गाठी घेतल्या. नाईक परिवार शिवसेनेत जाणार असल्याची पक्की बातमी समजल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग शनिवारी सकाळीच पुसदच्या बंगल्यावर पोहोचले. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, पक्ष सोडून जाऊ नका अशी विनंती बेग यांनी केली. एवढेच नव्हे तर आमदार नाईकांचे थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणेही करून दिले. मात्र त्यानंतरही मनोहरराव नाईकांचे मन राष्ट्रवादीत थांबण्याबाबत वळले नाही. आपण शिवसेनेत जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नाईकांना राष्ट्रवादीत थांबविण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार ख्वाजा बेग यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली नाही.
मनोहरराव नाईकांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर राजकीय स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. मनोहरराव नाईक शिवसेनेत जात असल्याने पुसद विभागात राष्ट्रवादी काँग्रेस संपल्यात जमा असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यात मुळातच राष्ट्रवादीची ताकद कमी होती. विदर्भात एकमेव मनोहरराव नाईक हे पक्षाचे आमदार होते. मात्र आता तेही पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादी आणखी कमजोर झाल्याचे मानले जाते. त्याच वेळी ज्येष्ठ मंडळी पक्षातून बाहेर पडत असल्याने किमान आता तरी नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा तरुणाईकडून व्यक्त केली जात आहे. नाईक कुटुंबाच्या शिवसेनेत जाण्याने कुणाला काय फायदा होईल व काय नुकसान याचे गणित राजकीय स्तरावर चर्चेतून मांडले जात आहे.
माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून घ्या
मनोहरराव नाईकांचे समर्थकांना भावनिक आवाहन घरी बसून जनतेची सेवा करणार
पुसद : मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, समर्थकांसोबत आपण शिवसेनेत प्रवेश करणार आहोत, आतापर्यंत तुम्ही मला सहकार्य केले यापुढे माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून घ्या असे भावनिक आवाहन ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहरराव नाईक यांनी केले. आमदार नाईक यांनी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक सोमवारी येथे बोलाविली होती. या बैठकीच्या व्यासपीठावर आमदार मनोहरराव नाईक, पुसदच्या नगराध्यक्ष अनिताताई नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार इंद्रनील नाईक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मनोहरराव नाईक यांनी अवघे दोन मिनिटे संबोधित केले. ते म्हणाले, सत्तेशिवाय लोकांची कामे होत नाही, निधी मिळत नाही म्हणून जो पक्ष सत्तेत आहे त्याच्या सोबत जाणे गरजेचे असते. मी स्वत: घरी बसून लोकांची सेवा पुढेही करत राहणार, मात्र माझ्या दोन्ही मुलांना मला केले तसेच सहकार्य करा, सांभाळून घ्या अशी विनंती आमदार नाईकांनी उपस्थित समर्थकांना केली.