नेरमधील २२ गावांत पाण्यासाठी हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:24 PM2019-05-20T21:24:01+5:302019-05-20T21:24:52+5:30
पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.
तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दहा लाख ४० हजारांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. यातून टँकरने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण आदी उपायांना प्राधान्य दिले जाणार आहे. तालुक्याच्या काही गावात एप्रिलपासूनच पाण्यासाठी मारामार सुरू आहे. मे महिन्यात याची तीव्रता आणखी वाढली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाच्या पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. २२ गावे पाणीटंचाईग्रस्त आहे. सात गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
खरडगाव, सातेफळ, आजंती, चिखली(कान्होबा), दहीफळ, जवळगाव, पेंढारा, मालखेड(खु), बोरगाव, घारेफळ, घुई, वाळकी, सावंगा, चिकणी(डोमगा), चिचगाव, झोंबाडी, पेंढारा, मालखेड(बु), सावरगाव(काळे), सोनखास, सोनवाढोणा, उत्तरवाढोणा आदी गावांमध्ये पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. टंचाईग्रस्त गावातील प्रश्न निकाली काढण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी सांगितले. नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
योजनांची कामे तकलादू
तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेली पाणीपुरवठा योजनांची कामे तकलादू आहेत. पाईपलाईन योग्यरित्या टाकली गेली नाही. निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. जागोजागी फुटलेले पाईप दूषित पाणीपुरवठ्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या व इतर कारणांमुळे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.