कोर्टात वकील, पक्षकारांचा वेळ वाचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:03 PM2018-09-19T23:03:46+5:302018-09-19T23:04:19+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि कामगार न्यायालयात ई-कोर्ट प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे पक्षकारांना आपले प्रकरण कुठल्या स्थितीत आहे, पुढची तारीख केव्हा आहे, याची माहिती क्षणात उपलब्ध होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. त्याकरिता क्युसेस मशीन न्यायालय परिसरात लावण्यात आली आहे. न्यायालयाचा निकालही या ठिकाणी जाणून घेता येणार आहे.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि कामगार न्यायालयात ई-कोर्ट प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे पक्षकारांना आपले प्रकरण कुठल्या स्थितीत आहे, पुढची तारीख केव्हा आहे, याची माहिती क्षणात उपलब्ध होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. त्याकरिता क्युसेस मशीन न्यायालय परिसरात लावण्यात आली आहे. न्यायालयाचा निकालही या ठिकाणी जाणून घेता येणार आहे.
पूर्वी पक्षकाराचा पुढील तारीख कधी आहे आणि प्रकरण कुठल्या स्थितीत पोहोचले आहे याची माहिती मिळविण्यात वेळ खर्ची जात होता. शिवाय तारीख चुकल्यास पडणारा भुर्दंड वेगळाच होता.
आता नवीन पध्दतीमुळे पक्षकाराला आपल्या प्रकरणाचा नंबर माहित नसला तरी, नाव टाकताच प्रकरणाची संपूर्ण माहिती स्क्रिनवर दिसणार आहे. यामध्ये आतापर्यंत किती तारखा झाल्या, केस नंबर, पुढील तारीख, प्रकरणाची मागील तारखेस काय स्थिती होती याची संपूर्ण माहिती स्क्रिनवर पाहता येणार आहे. यामुळे ही प्रणाली सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी आहे. कामकाजाची गती वाढविण्यास मोलाची मदत करणारी ठरणार आहे. यावर संपूर्ण माहिती अपडेट करण्याची जबाबदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांवरच टाकण्यात आली आहे.
तारखांचे ‘एसएमएस’
न्यायालयात दाखल प्रकरणातील तारखांवर पक्षकारांना उपस्थित राहता यावे म्हणून तारखेचे ‘एसएमएस’ पाठविण्याची सुविधा अलिकडच्या काळात विकसित झाली. केस फाईल करताना त्यावर पक्षकारांचा मोबाईल नंबर आवश्यक आहे.
आधुनिक मशीन सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. पक्षकाराने वकिलांना फोन करून माहिती विचारण्याची आवश्कता राहणार आहे. केस कुठे सुरू आहे, न्यायाधीश कोण आहेत, पुढील तारीख कोणती यासह विविध माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे न्यायालयात जाणारा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
- अॅड. मिनाज मलनस
अध्यक्ष, बार कौन्सिल, यवतमाळ