चौकशीसाठी एलसीबीचे प्रमुख वणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:25 PM2019-06-27T21:25:50+5:302019-06-27T21:26:10+5:30
पोलिसांनी मारहाण केल्यानेच निराश होऊन मारोती बोन्शा सुरपाम याने वणी पोलीस ठाण्यात विष प्राशन केले, असा गंभीर आरोप करीत बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नातलगांनी मारोती सुरपामचा मृतदेह अॅम्बुलन्सद्वारे वणी पोलीस ठाणे परिसरात आणला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पोलिसांनी मारहाण केल्यानेच निराश होऊन मारोती बोन्शा सुरपाम याने वणी पोलीस ठाण्यात विष प्राशन केले, असा गंभीर आरोप करीत बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नातलगांनी मारोती सुरपामचा मृतदेह अॅम्बुलन्सद्वारे वणी पोलीस ठाणे परिसरात आणला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी या प्रकरणी सर्वतोपरी चौकशी केली जाईल, जो दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन मृताच्या नातलगांना दिल्यानंतर मारोती सुरपामचे पार्थिव रात्री उशिरा त्याच्या गावी नेण्यात आले.
दरम्यान, गुरूवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एलसीबी प्रमुख प्रदीप सिरस्कर हे वणीत दाखल झाले. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीदेखील करण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मारोती सुरपाम हा वणी पोलीस ठाण्यात गेला होता. तो मुळचा कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव येथील रहिवासी आहे. त्याचे सासर वणी आहे. कौटुंबिक वादासंदर्भातील तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्याची तक्रार न स्विकारता त्याला डी.बी.रुममध्ये बसवून ठेवले, असा नातलगांचा आरोप आहे. या ठिकाणी पोलिसांकडून मारहाण झाल्याने मारोती निराश झाला व त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केले, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी मात्र हा आरोप नाकारला आहे. मारोती जेव्हा पोलीस ठाण्यात आला, तेव्हा त्याची मनस्थिती ठिक दिसत नव्हती. त्याचे वर्तन मनोरुग्णासारखे वाटल्याने त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. काही वेळानंतर तो ठाण्याच्या आवारात पडून दिसल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
बुधवारी उपचारादरम्यान, मारोतीचा चंद्रपुरात मृत्यू झाला. त्यामुळे दोषींविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका तेथे मृताच्या नातलगांनी घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह ठाण्यावर आणण्यात येणार असल्याची चर्चा बुधवारी दुपारपासूनच वणी शहरात होती. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट होती. मात्र दिवसभर अशा कोणत्याही घडामोडी घडल्या नाहीत. रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक एका रुग्णवाहिकेत मारूतीचा मृतदेह घेऊन त्याचे नातलग वणीत पोहचले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच, टिळक चौकासह मुख्य मार्गावरील दुकाने लगेच बंद झाली. वणी-यवतमाळ मार्गावर तहसीलजवळ रुग्णवाहिका थांबविण्यात आली. या ठिकाणी मोठा जमाव एकत्र आला होता. त्यामुळे शिरपूर, मारेगाव येथील पोलिसांची कुमक वणीत बोलविण्यात आली.
दरम्यान, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी मारोतीच्या नातलगांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर नातलगांच्या बाजुने लढा देत असलेले सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील धुर्वे यांनी स्वत: याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर जो कुणी दोषी आढळेल, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले.
शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीला
गुरूवारी वणी येथून सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील धुर्वे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ यवतमाळकडे रवाना झाले. तेथे हे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेणार आहे. जोपर्यंत मारोती सुरपामला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे धुर्वे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.