केळापुरातील जुगारावर एलसीबीची धाड, २२ जुगारी ताब्यात; १८ लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:39 PM2023-06-20T13:39:53+5:302023-06-20T13:44:48+5:30

परिक्षेत्रातील सर्वात मोठी कारवाई : जुगार भरविणाराच झाला पसार

LCB raids on gambling in Kelapur, 22 gamblers arrested; 18 lakh cash seized | केळापुरातील जुगारावर एलसीबीची धाड, २२ जुगारी ताब्यात; १८ लाखांची रोकड जप्त

केळापुरातील जुगारावर एलसीबीची धाड, २२ जुगारी ताब्यात; १८ लाखांची रोकड जप्त

googlenewsNext

पांढरकवडा : केळापूर-पारवा मार्गावर एका घरात राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर यवतमाळच्या एलसीबी पथकाने धाड टाकून २२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी (दि. १८ जून) रात्रीच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी १८ लाख ११ हजार रुपयांच्या रोख रकमेसह ५८ लाख ४४ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अलीकडील काळात करण्यात आलेली ही सर्वात माेठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे.

गब्बर मोतेखां पठाण (रा. रामनगर, यवतमाळ), रणजित फुलसिंग चव्हाण, (रा. राममंदिर वॉर्ड, पांढरकवडा), ईश्वर सुधाकर ठाकरे (रा. पेठवॉर्ड, राजुरा (जि. चंद्रपूर), आदिल हुसेन पासवाल (रा. लोहारलाईन, पांढरकवडा), शालेंद्र भाऊराव चव्हाण (रा. कोरपना (जि. चंद्रपूर), आवेज शकील अन्सारी (रा. मौलाना आझाद वॉर्ड, राजुरा), शुभम अशोक राय (रा. आंबेडकर चौक, पांढरकवडा), मोहम्मद मकसूद मोहम्मद मन्सुर पारेख (रा. कोरपना, (चंद्रपूर), सैयद जिब्राईल सैयद ईब्राहीम (रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर), सचिन केशव मुद्यलवार (रा. गढी वॉर्ड, पांढरकवडा), प्रियम अशोक राय (रा. आखाडा वाॅर्ड, पांढरकवडा), सिनू राजू झुपाका (रा. लक्कडकोट, ता. राजुरा, (जि. चंद्रपूर), मिथुन छगन चावरे (रा. आंबेडकर वॉर्ड, पांढरकवडा), शेख आसिफ शेख चांद (रा. पारवा), साहील शफाक शेख (रा. शिवाजी वॉर्ड, राजुरा (जि. चंद्रपूर), शकील शेख चांद (रा. पारवा), प्रमोद उत्तमराव भोयर (रा. केळापूर), आकाश किशोर बोरेले (रा. शास्त्रीनगर, पांढरकवडा), आकाश पृथ्वीराज तिवारी (रा. चापनवाडी, यवतमाळ), गणेश पांडुरंग आस्वले (रा. वसंतनगर, घाटंजी), आशिष धीरज बहुरीया (रा. सातल सुभाष वाॅर्ड, बल्लारशहा आणि हाफिज रहेमान खलिल रहेमान (रा. विराणी टॉकीज रोड, वणी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केळापूर येथील पारवा जाणारे रोडवर संतोषी माता मंदिरालगत असलेल्या उदय नवाडे याच्या मालकीचे घरातील बंद खोलीत काही जुगारी बावन्न तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून एक्का बादशहा नावाचा हार-जीतचा जुगाराचा खेळ राजरोसपणे खेळत होते. याबाबतची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेसी यांना मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे एक पथक त्या ठिकाणी कारवाईसाठी रवाना करण्यात आले. अमरावती परिक्षेत्रातील सध्याची सर्वात मोठी कारवाई आहे. 

या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, तर घरमालक उदय नवाडे फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे, पथकातील बंडू डांगे, सैयद साजीद, अजय डोळे, रूपेश पाली, विनोद राठोड, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, चालक अमित कुमरे यांनी पार पाडली.

असा लागला मुद्देमाल पोलिसांच्या हाती

रविवारी रात्रीच्या सुमारास एलसीबी पथकाने धाड टाकली असता, २२ जुगारी त्या ठिकाणी आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी १८ लाख ११ हजार ५०० रुपयाची रोख रक्कम, १५ नग मोबाईल फोन किंमत ३ लाख ३० हजार ५००, तीन नग ताशपत्त्यांचे कॅट, सहा गाद्या, तीन आलिशान कार असा एकूण ५८ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात अवैध धंदे चालणार नाही

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत. तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, याकरिता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी एलसीबी पथकाला आदेशित केले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अवैध धंद्यांची गोपनीय माहिती काढून प्रभावी रेड कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

Web Title: LCB raids on gambling in Kelapur, 22 gamblers arrested; 18 lakh cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.