काँग्रेसच्या ‘आऊटगोर्इंग’वर नेते बिनधास्त
By admin | Published: February 7, 2017 01:21 AM2017-02-07T01:21:37+5:302017-02-07T01:21:37+5:30
सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष सध्या सत्तेबाहेर आहे.
म्हणे, जाणाऱ्यांना खुशाल जाऊ द्या : सत्ता नसताना पक्षासोबत राहणारेच प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते
यवतमाळ : सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष सध्या सत्तेबाहेर आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी या पक्षाची साथ सोडून सत्ताधाऱ्यांच्या धावत्या गाडीत आश्रय घेतला आहे. परंतु असे स्वार्थी नेते-कार्यकर्ते कधी पक्षाचे निष्ठावान नव्हतेच. आज वाईट अवस्थेत काँग्रेस सोबत असतील तेच खरे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते. त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांना खुशाल जाऊ द्या, एकदाचे आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट होऊ द्या, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात बंडखोरी पहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही असेच काहीसे चित्र होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही कार्यकर्ते भाजपातून सेनेत व तिकीटासाठी सेनेतून भाजपातही गेले. परंतु असे पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या काँग्रेस पक्षात अधिक पहायला मिळाली. कारण हा पक्ष सध्या सत्तेबाहेर आहे. गेली १५ वर्षे राज्यात काँग्रेसची सत्ता असताना सर्वजण या पक्षासोबत होते. मात्र सत्ता जाताच ते या पक्षाची साथ सोडून जात आहेत. सर्वत्र भाजपाची लाट आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मिळाली तरी निवडून येईलच याची शाश्वती त्यांना वाटत नसावी. म्हणून की काय अनेकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षासोबत फारकत घेतली. त्यांनी भाजपा-सेनेशी घरठाव केला. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात ‘आऊटगोर्इंग’ सुरू आहे. परंतु त्याबाबत काँग्रेसची नेते मंडळी अगदी बिनधास्त दिसत आहे. त्यांनी जाणाऱ्यांना थांबविण्याचा फारसा प्रयत्नही केल्याचे दिसत नाही. या नेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सध्याच्या स्थिती पेक्षा काँग्रेसची आणखी वाईट अवस्था होणे नाही. त्यामुळे आज बिकट परिस्थितीत जे पक्षासोबत राहतील, तेच प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते असे समजायला हरकत नाही. जे पक्ष सोडून गेले त्यांची निष्ठा पक्षाशी नव्हे तर सत्तेशी होती. या कठीण परिस्थितीत आपले कोण आणि परके कोण हे मात्र पाहता आले.
आता या प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांना सत्तेच्या वेळी संधी देताना प्राधान्यक्रम राखला जाईल, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस सोडून गेलेल्यांचा त्या-त्या पक्षाला खरोखरच किती फायदा होतो हे पाहणेही महत्वाचे ठरते. ऐनवेळी पक्षांतराच्या उड्या मारणाऱ्यांचे राजकारण संपणार असा दावाही या नेत्यांकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत नवखे सदस्य टिकणार काय ?
‘मिनी मंत्रालय’ म्हणून नावारुपास आलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक अधिकारी-कर्मचारी ‘दिग्गज’ म्हणून वर्षानुवर्षे ओळखले जातात. त्यांच्या संघटनाही एकीच्या बळावर प्रशासनाला घाम फोडतात. केवळ अभ्यास व अनुभव असलेल्या पदाधिकारी-सदस्यांपुढेच या दिग्गजांची डाळ शिजत नाही. परंतु सध्याच्या निवडणूक रिंगणातून बहुतांश अभ्यासू सदस्य बाहेर आहेत. चार-दोन चेहरे वगळता (तेही निवडून आले तरच) आगामी जिल्हा परिषदेमध्ये बहुतांश नवखेच सदस्य राहणार आहे. त्यामुळे या नवख्यांना जिल्हा परिषदेची ही यंत्रणा जुमानणार काय ? असा प्रश्न आहे. जिल्हा परिषद व त्याचे कायदे-नियम समजून घेताना या सदस्यांचा अर्धा कार्यकाळ निघून जाईल, या नवख्यांना ‘झेडपी’ची यंत्रणा नियमावली दाखवून फिरविणार तर नाही ना? अशी शंका आतापासूनच राजकीय गोटात वर्तविली जात आहे.