झरीत पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली
By admin | Published: March 15, 2016 04:17 AM2016-03-15T04:17:57+5:302016-03-15T04:17:57+5:30
पांढरकवडा वन विभागांतर्गत झरी तालुक्यात एका पट्टेदार वाघिनीचा कुजलेला मृतदेह सोमवारी सकाळी
झरीजामणी : पांढरकवडा वन विभागांतर्गत झरी तालुक्यात एका पट्टेदार वाघिनीचा कुजलेला मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. या वाघिणीच्या शिकारीची बाब वन खात्याने स्पष्टपणे फेटाळून लावली असली तरी तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने घातपाताची शंका कायम आहे.
झरी तालुक्यातील बोपापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर वन विकास महामंडळाच्या पवनार येथील जंगलात कक्ष क्र. २३ मध्ये पाण्यात वाघिनीचा मृतदेह आढळला. स्वयंसेवी संस्थांचे सुरेश बावणे व राजू देवाळकर हे दोन कार्यकर्ते रविवारी सायंकाळी त्या भागात फिरत असताना त्यांना दुर्गंधी आली. त्यांनी याची कल्पना वन खात्याला दिली. त्यावरून मुकुटबनचे वन परिक्षेत्र अधिकारी रत्नपारखी यांनी रविवारी सकाळपासूनच दुर्गंधी येत असलेल्या दिशेने शोधमोहीम चालविली. तेव्हा एका पट्टेदार वाघिनीचा अर्धाअधिक कुजलेला मृतदेह पाण्यात आढळून आला. सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. सव्वा मीटर उंच आणि चार ते साडेचार वर्ष वयाच्या या वाघिनीची नखे, दात, कातडे शाबूत असल्याने शिकारीचा उद्देश नसावा, असे वन अधिकारी दाव्याने सांगत आहे. मात्र तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक जी.गुरूप्रसाद (आयएफएस) यांच्या उपस्थितीत सदर वाघिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वाघिनीवर शिकारीच्या दृष्टीने विष प्रयोग करण्यात आला का, शेताच्या कुंपनाच्या तारेचा वीज स्पर्श होऊन मृत्यू झाला का, की पाण्यात बुडून मृत्यू झाला या सर्व पैलूंनी वन विभागाची यंत्रणा चौकशी करीत आहे. या वाघिनीचा नैसर्गिक मृत्यू झाला असण्याची शक्यताही वन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
दरम्यान घटनास्थळी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बावणे, डॉ.नाळे, बनसोड, डॉ.देवकर आदींनी वाघीणीच्या मृतदेहाचा पंचनामा केला. या घटनेने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)
पांढरकवडा वन विभागात १० वाघांची नोंद
४पांढरकवडा वन विभागांतर्गत विखुरलेल्या संरक्षित जंगलांमध्ये नऊ ते दहा वाघांचे अस्तित्व असल्याची नोंद वन विभागाच्या दप्तरी आहे. व्याघ्र गणनेमध्ये ती वारंवार सिद्ध झाली. या वाघिनीच्या मृत्यूने मात्र या विभागात पट्टेदार वाघांची संख्या घटली आहे. याशिवाय पांढरकवडा तालुक्यातच असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्येसुद्धा १२ ते १६ वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. प्रत्यक्षात नोंद मात्र पाच ते सहाच वाघांची आहे.
मानवाचे पाच बळी वाघाचा पहिलाच
४पांढरकवडा-वणी विभागांतर्गत वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत महिलांसह पाच शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. वाघाने शिकार केलेल्या पाळीव जनावरांची संख्या तर डझनाने आहे. या वाघांची झरी व वणी तालुक्यात सर्वाधिक दहशत पहायला मिळते. अनेक गावकऱ्यांना व्याघ्र दर्शन झाले आहे. त्यामुळे सायंकाळपूर्वीच शेतकरी-शेतमजूर घराची वाट धरतात. पांढरकवडा वन विभागात वाघिनीच्या मृत्यूचे मात्र हे पहिलेच प्रकरण आढळून आले आहे.
पट्टेदार वाघिनीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. शरीराचे सर्व भाग सुस्थितीत असल्याने शिकार नक्कीच नाही.
- जी.गुरूप्रसाद
उपवनसंरक्षक, पांढरकवडा.