कार्यकर्त्यांच्या भूमिकेने नेते अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 09:44 PM2019-07-11T21:44:48+5:302019-07-11T21:45:36+5:30
अंतर्गत मतभेदातून कार्यकर्त्यांनी बंडाची भूमिका स्विकारल्याने भाजपा, सेना व कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेते सध्या अस्वस्थ आहेत. कधी नव्हे ते यावेळी एकाच पक्षातून अनेक कार्यकर्ते तिकीट मागण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या अधिक आहे.
संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : अंतर्गत मतभेदातून कार्यकर्त्यांनी बंडाची भूमिका स्विकारल्याने भाजपा, सेना व कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेते सध्या अस्वस्थ आहेत. कधी नव्हे ते यावेळी एकाच पक्षातून अनेक कार्यकर्ते तिकीट मागण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या या भूमिकेने नेते चिंतेत पडले आहेत.
कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आता चेहरा बदल हवा आहे. त्यामुळे तब्बल १७ जणांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले आहे. त्यात कॉंग्रेसशी संलग्नित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राजूर कॉलरी येथील पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला सभापती, बँक उपाध्यक्षाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण प्रस्थापित नेत्याच्या अगदी निकटस्थ मानले जातात. या ईच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या मागे मोठा राजकीय ‘गेम’ असल्याचीही चर्चा रंगत आहे.
दुसरीकडे भाजपामध्ये दोन युवा कार्यकर्त्यांनीदेखील तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातील एक भाजपाच्या युवा चळवळीशी संबंधित संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे, तर दुसरा ईच्छुक उमेदवार ‘संघ’ परिवाराशी कनेक्शन ठेऊन आहे. हे दोघे विद्यमान आमदारांना तिकीटासाठी कसा शह देतील, यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेनेत उघडपणे पडलेले दोन गट, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या एका नेत्याने पक्षातच वेगळी चूल मांडली आहे. याही पक्षात चेहरा बदल करण्याची भाषा बोलली जात आहे.
सेनेतील काही नाराज कार्यकर्ते सध्या या नेत्यासोबत आहेत. मात्र वणीतील प्रस्थापित शिवसेना नेत्याला शिवसेनेतील हा नाराज गट शह देऊ शकेल काय, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मनसे आणि राष्टÑवादी कॉंग्रेसमध्ये मात्र सध्या तरी कलह पुढे आलेला नाही. या दोनही पक्षातील संभावित उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
राजकीय पक्षांच्या युतीकडे सर्वांच्या नजरा
वणी विधानसभा मतदार संघातील सर्वच प्रस्थापित नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असले तरी कोणत्या राजकीय पक्षाशी कुण्या पक्षाशी युती होते, हे अद्याप ठरले नाही. युती झाल्यास या पक्षांमध्ये बंडाळी वाढण्याची चिन्हे आहेत. आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी सामंजस्याने दूर करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी विविध पक्षातील नेत्यांना पार पाडावी लागणार आहे. अन्यथा उमेदवारांना त्यांच्याच पक्षातून फटाके लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.