डिजिटल शाळांना पुढाऱ्यांचा सुरुंग
By Admin | Published: March 18, 2016 02:44 AM2016-03-18T02:44:32+5:302016-03-18T02:44:32+5:30
लोकसहभागातून डिजिटल शाळा करण्याचे शासनाचे निर्देश आहे. यासाठी काही गावातील शाळांनी पुढाकार घेतला.
कळंब तालुका : नऊपैकी एकाच पदाधिकाऱ्याच्या गावात डिजिटल
गजानन अक्कलवार कळंब
लोकसहभागातून डिजिटल शाळा करण्याचे शासनाचे निर्देश आहे. यासाठी काही गावातील शाळांनी पुढाकार घेतला. परंतु पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्याच गावातील शाळा डिजिटल नसल्याचे वास्तव तालुक्यात आहे.
लोकसहभाग व लोकवर्गणीतून डिजिटल शाळा करण्यासाठी काही शाळांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या गावातील शाळा डिजीटल होणे अपेक्षित होते. परंतु तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती सदस्यांच्या गावातील शाळाच डिजिटल झालेल्या नाही.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण देशमुख यांचे सावरगाव हे मूळगाव. त्यांच्या गावातील शाळा डिजिटल होणे क्रमप्राप्त होते. परंतु या गावात डिजिटल शाळा करण्यासाठी कुठल्याही हालचाली झालेल्या नाही. हीच स्थिती कळंबची आहे. या गावात जिल्हा परिषद सदस्य नीलिमा गोहणे व पंचायत समितीचे उपसभापती विजय गेडाम या दोन पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. खरे पाहिले तर तालुक्याचे ठिकाण असलेल्या कळंब गावातून डिजिटल शाळेची सुरुवात व्हायला पाहीजे होती. कारण येथून लोकवर्गणी होण्यासाठी मोठा वाव आहे. परंतु या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे व शिक्षकांच्या अनास्थेमुळे एकही शाळा डिजीटल होण्याच्या मार्गावर नाही. दुसरीकडे मात्र लहान-लहान गावातील शाळांचे मात्र डिजीटलमध्ये कधीचेच रुपांतर झालेले आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी खरे तर आत्मचिंतन करावे, अशीच स्थिती आहे. पंचायत समितीच्या सभापती वर्षा वासेकर यांचे नांझा येथे वास्तव्य आहे. तालुक्यातील मोठ्या गावापैकी एक असलेल्या नांझा गावातही अजूनपर्यंत डिजीटल शाळा झालेली नाही. पंचायत समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या गावातील हि स्थिती असेल तर इतर गावानी काय आदर्श घ्यावा, यावर विचारमंथन न केलेलेच बरे.
पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती प्रल्हाद मांडवकर यांच्या देवनळा या गावातही डिजीटल शाळेसाठी प्रयत्न झालेले नाही. ही स्थिती माजी उपसभापती विजय सुटे यांच्या सुकळी गावची आहे. पंचायत समिती सदस्य किरण पवार यांच्या किन्हाळा गावही डिजीटल शाळेपासून वंचित आहे. तसेच पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी यांचे पिंपळगाव गावातही डिजीटल शाळेला खो मिळालेला आहे. केवळ जिल्हा परिषद सदस्य दिवाकर ढोले यांच्या परसोडी या गावात डिजीटल शाळा सुरु करण्यात आली. परसोडी येथील सरपंच आनंदराव जगताप यांची डिजीटल शाळा करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे, हे विशेष.