काँग्रेसचे नेतृत्त्व पुन्हा पराभुताकडेच !
By admin | Published: November 6, 2014 11:02 PM2014-11-06T23:02:33+5:302014-11-06T23:02:33+5:30
ज्या नेत्याच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात काँग्रेस लोकसभेत आणि पाठोपाठ विधानसभेत पराभूत झाली त्याच नेत्याकडे पुन्हा जिल्हा काँग्रेसचे नेतृत्त्व ठेवण्याची तयारी पक्षस्तरावर सुरू आहे.
यवतमाळ : ज्या नेत्याच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात काँग्रेस लोकसभेत आणि पाठोपाठ विधानसभेत पराभूत झाली त्याच नेत्याकडे पुन्हा जिल्हा काँग्रेसचे नेतृत्त्व ठेवण्याची तयारी पक्षस्तरावर सुरू आहे. या पराभूत नेत्याच्या नेतृत्त्वात पुन्हा काँग्रेसच्या नव्या टीमची जुळवाजुळव केली जात आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोन मंत्री पराभूत झाले. त्यावेळी वामनराव कासावार हे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर राजीनाम नाट्य रंगले. त्यातून वामनरावांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाला जीवदान मिळविले. वामनरावांच्याच नेतृत्त्वात काँग्रेस विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली. जिल्हाध्यक्ष स्वत: वणी विधानसभेच्या आखाड्यात उतरल्याने त्यांना पक्षाच्या अन्य उमेदवारांसाठी काहीही योगदान देता आले नाही. निवडणूक काळात काँग्रेसची कार्यकारिणीही अस्तित्वात नव्हती. केवळ जिल्हाध्यक्ष होते. तेही स्वत:च्या निवडणुकीत गुंतले होते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा कार्यकारिणीशिवाय काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरे गेला. त्यामुळे व्हायचे तेच झाले. काँग्रेसचा पूर्णत: सफाया झाला. वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, उमरखेड हा काँग्रेसचा गड भाजपमय झाला. नवख्या उमेदवारांनी काँग्रेसच्या दीर्घ अनुभवी नेत्यांना पराभवाची धूळ चारली. काँग्रेसचे नेते आता मोदी लाटेआड स्वत:चा पराभव लपवित असले तरी या निवडणुकीने काँग्रेस व कार्यकर्ते, काँग्रेस व मतदार यांच्यात वाढलेली दरी अधोरेखित केली.
विधानसभेतील पराभवाचे चिंतन करण्याची गरज अद्याप जिल्ह्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला वाटलेली नाही. उलट प्रमुख नेत्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्षाकडेच पद कसे कायम राहील, यासाठी पुन्हा प्रयत्न चालविले आहे. पुन्हा जिल्हा काँग्रेसची वाटचाल पराभूताच्या नेतृत्त्वातच होण्याची चिन्हे आहेत. वास्तविक नव्या दमाच्या तरुणाकडे जिल्हा काँग्रेसची धुरा सोपविणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा कार्यकारिणीत कुणाला घ्यावे, यासाठी प्रमुख पराभूत उमेदवारांची छुपी बैठक पार पडली. यावरून नव्या कार्यकारिणीत पुन्हा जुने चेहरे दिसणार हे स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)