विज्ञान शाखेत मोहित तर वाणिज्य शाखेत लीना अव्वल
By admin | Published: May 26, 2016 12:02 AM2016-05-26T00:02:37+5:302016-05-26T00:02:37+5:30
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत यवतमाळच्या अॅग्लो हिंदी विद्यालयाचा विद्यार्थी ....
बारावीचा निकाल ८२.८३ : विज्ञान ९४.१५, कला ७६.०७, वाणिज्य ९०.४५
यवतमाळ : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत यवतमाळच्या अॅग्लो हिंदी विद्यालयाचा विद्यार्थी मोहित जयंतीलाल विठ्ठलाणी हा ९३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरला. तर जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी लीना शंकर तलवार ही वाणिज्य शाखेत ९३.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिली आली आहे. जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ८२.८३ टक्के लागला असून सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यात उमरखेड तालुका अव्वल ठरला असून बाभूळगाव तालुका मात्र माघारला आहे.
१२ वीचा निकाल बुधवारी घोषित होताच निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलवरूनही निकाल माहीत करून घेतला. यवतमाळ जिल्ह्यातून १२ वीच्या परीक्षेला २९ हजार ३९२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४ हजार ३४५ म्हणजे ८२.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विज्ञान शाखेचे ९ हजार ११५ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ५५२ म्हणजे ९४.१५ टक्के, कला शाखेचे १६ हजार २६७ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३७४ म्हणजे ७६.०७ टक्के, वाणिज्य शाखेचे दोन हजार ७०२ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ४४४ म्हणजे ९०.४५ टक्के आणि किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १३०८ विद्यार्थ्यांपैकी ९४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ७२.२५ टक्के आहे. प्राविण्य श्रेणीत विज्ञान शाखेत ३८४, कला शाखेत ५०४ आणि वाणिज्य शाखेत ३८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल ८९.५६ टक्के उमरखेड तालुक्याचा लागला असून सर्वात कमी बाभूळगाव तालुक्याचा ६८.५८ टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.१८ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.९५ आहे. सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार, १२ वीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत अव्वल आलेले तीनही विद्यार्थी यवतमाळच्या अॅग्लो हिंदी विद्यालयाचे आहे. या विद्यालयाचा विद्यार्थी मोहित जयंतीलाल विठ्ठलाणी हा ६५० पैकी ६०५ गुण म्हणजे ९३ टक्के गुण जिल्ह्यात अव्वल आला आहे. या विद्यालयाचा विद्यार्थी जसवंतसिंग पवार ९२ टक्के आणि जयंत नरेंद्र भुसकट ९१.६९ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय आले आहे.
वाणिज्य शाखेत जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी लीना शंकर तलवार ही ६५० पैकी ६०७ म्हणजे ९३.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. अमोलकचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेहा मनीष गंडेचा हिला ९३.०८ टक्के, उमरखेडच्या कॉमर्स मॉडर्न पब्लीक स्कूलची विद्यार्थिनी रश्मी रवीकांत पांडे हिला ९२.९२ टक्के आणि जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी यामिनी रवींद्र तट्टे हिला ९२.६१ गुण मिळाले आहे. यवतमाळच्या जाजू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती आसुराज साळवे हिला ९२.३० टक्के गुण मिळाले आहे. वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांनी भरारी घेतल्याचे दिसत आहे.
सहा शाळा १०० टक्के
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात यवतमाळ येथील डॉ. नंदूरकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, दारव्हा तालुक्यातील खोपडी बु. येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, उमरखेड (नागापूर) येथील मॉडर्न पब्लिक स्कूल, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील के.डी. जाधव विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथील विद्या निकेतन स्कूल आणि घाटंजी येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के लागला नाही, हे विशेष. (शहर वार्ताहर)
मोहितला डॉक्टर व्हायचंय
यवतमाळ येथील गोदनी मार्गावरील अष्टविनायक अपार्टमेंटमधील रहिवासी आणि अॅग्लो हिंदी विद्यालयाचा विद्यार्थी मोहित विठ्ठलाणी याला बारावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाल्याचे कळताच घर आनंदाने न्हावून निघाले. तो बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून अव्वल ठरला आहे. नियमित तीन ते चार तास दररोज अभ्यास करून मोहितने यश प्राप्त केले. वडील जयंतीलाल हे व्यावसायिक असून आई हिना गृहिणी आहे. मोठी बहीण निधी ही एमबीबीएस करीत असून तिचाच आदर्श घेऊन मोहितलाही डॉक्टर व्हायचे आहे. ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची सेवा करायची आहे, असे मोहितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.