पालिकेच्या शाळांना गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:18 PM2018-06-15T22:18:23+5:302018-06-15T22:18:23+5:30
शहरातील नगरपरिषद शाळांची दुरावस्था झाली आहे. आवश्यक सुविधाही त्याठिकाणी नाही. बैठक व्यवस्था सुस्थितीत नाही. काही शाळांना तर दारे-खिडक्याही नाहीत. याचाच परिणाम पटसंख्येवर होत आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या घटत चालली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील नगरपरिषद शाळांची दुरावस्था झाली आहे. आवश्यक सुविधाही त्याठिकाणी नाही. बैठक व्यवस्था सुस्थितीत नाही. काही शाळांना तर दारे-खिडक्याही नाहीत. याचाच परिणाम पटसंख्येवर होत आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. पालिकेच्या शाळांची दैना दूर करावी, अशी मागणी होत आहे.
बहुतांश शाळांच्या इमारती डागडुजीवर आल्या आहेत. छत गळत असल्याने पावसाळ्यात वर्ग चालविणेही कठीण होणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालयांचीही वाणवा आहे. आसनपट्ट्या, डेस्क-बेंच काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी नादुरुस्त आहेत. नवीन सत्र सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहे. या दिवसांमध्ये शाळांची दुरुस्ती करावी, अशी मागणी गुरुदेव युवा संघाने केली आहे. या संदर्भात अध्यक्ष मनोज गेडाम यांनी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.
शहरातील काही शाळांची दैना प्रत्यक्ष पाहणी करून पालिकेकडे मांडण्यात आली आहे. नागपूर रोडवर असलेली हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्र.३ कचऱ्याचे माहेरघर झाले आहे. या शाळेच्या इमारतीला दारे-खिडक्या नाहीत. शौचालयात प्रचंड घाण आहे. मूत्रीघर तुंबले आहे. एवढेच नाही तर दारूच्या शिशाही या इमारतीच्या आवारात आढळून आल्या. ही बाब गेडाम यांनी यापूर्वीही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बंद शाळा सुरू व्हाव्या
पटसंख्येअभावी नगरपरिषदेच्या काही शाळा मागील काही वर्षात बंद झालेल्या आहे. या शाळा नव्याने सुरू करण्यात याव्या. इंग्रजी माध्यमाचे वर्ग याठिकाणी सुरू केल्यास गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होणार आहे. खासगी शाळांकडे जाणारा ओढाही यामुळे थांबणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने यादृष्टीने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.