पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय

By अविनाश साबापुरे | Published: December 2, 2023 05:04 PM2023-12-02T17:04:22+5:302023-12-02T17:05:00+5:30

फाॅरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी १३ वर्षांपासून संपेना.

Learn by spending money and work for a whole year that too for free A strange decision of the government in yavatmal | पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय

पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय

यवतमाळ : दिवसरात्र अभ्यास करून फाॅरेन्सिक तज्ज्ञ झालेले हजारो तरुण गेल्या तेरा वर्षांपासून बेरोजगार आहेत. त्यांच्या नोकरीसाठी कोणतेही पाऊल न उचलणाऱ्या सरकारने आता त्यांनी फुकटात काम करावे, असा अजब निर्णय घेतला आहे. वेळ आणि पैसा खर्चून पदव्या घेतलेल्या या तरुणांनी शासनाच्या फाॅरेन्सिक लॅबमध्ये विनामानधन काम करावे, असा निर्णय गृह विभागाने जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, ही संधी हजारो तरुणांपैकी केवळ १५२ जणांनाच दिली जाणार असून तीही केवळ एका वर्षापुरतीच. दुसरी वर्षी तेही बेरोजगार !

 किचकट गुन्ह्यांचा माग काढण्यासाठी फाॅरेन्सिक तज्ज्ञ गरजेचे असतात. एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना देशात १ लाख १४ हजार फाॅरेन्सिक तज्ज्ञांची कमतरता असल्याचे केंद्र शासनाने तीन वर्षांपूर्वी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात फाॅरेन्सिक सायन्सचे शिक्षण घेतलेले हजारो तरुण बेरोजगार असूनही त्यांना नोकऱ्या नाहीत. या पदवीचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात तीन ठिकाणी न्यायसहायक विज्ञान संस्था सुरू करण्यात आल्या. त्यापैकी मुंबई व छत्रपती संभाजीनगरमध्ये २००९ साली तर नागपूर येथे २०११ साली ही संस्था सुरू झाली.

त्यातून आजवर तीन हजारांवर तरुण-तरुणी फाॅरेन्सिक सायन्सचे पदवीधर होऊन बाहेर पडले आहेत. मात्र त्यांना कुठल्याही पदावर शासनाने नोकरीची संधी दिलेली नाही. त्यात भर म्हणून आता शासनाने ‘फुकटात काम करा अन् अनुभव प्रमाणपत्र मिळवा’ असा निर्णय २१ नोव्हेंबर रोजी जारी केल्याने बेरोजगारांच्या जखमेवर मिठ चोळले गेले. १३ वर्षांपूर्वी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यालाही आता फाॅरेन्सिक लॅबमध्ये विनामोबदला इंटर्नशिप करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही इंटर्नशिप संपल्यावर नोकरीची हमी राहणार नाही, असे या निर्णयातच स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना इतर राज्यात संधीच नाही :

महाराष्ट्रात बीएस्सी फाॅरेन्सिक सायन्स पदवी केलेल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यातही नोकरीची संधी मिळत नाही. कारण इतर राज्यांमध्ये तेथे बीएस्सी फाॅरेन्सिक सायन्स असा कोर्सच नाही. तर तेथील लॅबमध्ये पदभरतीसाठी पदवीला केमिस्ट्री, बायोलाॅजी, फिजिक्स असे विषय बंधनकारक केले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील फाॅरेन्सिक लॅबमध्ये इंटर्नशिप देण्यापेक्षा कायमस्वरुपी जागा भराव्या, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे. 


४५ फाॅरेन्सिक व्हॅन कर्मचाऱ्यांविना:

राज्यात २०१७ साली गुन्ह्याच्या घटनास्थळाचा वैज्ञानिकदृष्ट्या पंचनामा करता यावा, यासाठी मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात आल्या. अशा ४५ व्हॅन सुरू करण्यात आल्या. त्या व्हॅनसाठी सर्व पदे कायमस्वरुपी मंजूर करण्यात आली होती. मात्र पहिल्या वर्षी केवळ ११ महिन्यांसाठी कंत्राटी भरती करण्यात आली. त्यानंतर ही पदे आजवर रिक्तच आहेत.


‘फाॅरेन्सिक’च्या बेरोजगारीची कारणे :

- हे शिक्षण गुन्हे तपासाशी संबंधित असल्याने रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. फाॅरेन्सिक लॅबशिवाय पर्याय नाही.

- फॉरेन्सिक लॅबकडून वेगवेगळी कारणे देऊन नव्या नियुक्त्यांना विरोध केला जात आहे.

- सेवाप्रवेश नियम सुधारणासाठी एमपीएससीने काढलेल्या त्रृटीचीही पूर्तता शासनाकडून करण्यात आली नाही.

- रोजगाराच्या नावाखाली केवळ एका वर्षाची इंटर्नशिप दिली जाते. त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना रोजगारासाठी तडफड करावी लागते.

Web Title: Learn by spending money and work for a whole year that too for free A strange decision of the government in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.