किमान त्यांचा मृत्यू तरी समाधानाने व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 09:41 PM2018-11-08T21:41:29+5:302018-11-08T21:41:58+5:30
उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात गुरुवारी सेवाधामचे लोकार्पण माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव यांनी समाजातील वृद्ध निराधारांबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात गुरुवारी सेवाधामचे लोकार्पण माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव यांनी समाजातील वृद्ध निराधारांबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप दिले.
ते म्हणाले, मी ११ वर्ष सरपंच असताना गावातील वयोवृद्ध मंडळी आपल्या समस्या मला सांगायचे. त्यांच्यासाठी काही तरी करण्याची इच्छा होती. एकदा गावात युवक शिबिर घेतले. त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी ह. रा. कुलकर्णी गावात आले आणि त्यांनी वृद्धाश्रम सुरू करण्याची प्रेरणा दिली. त्यातून हे कार्य सुरू झाले. प्रसंगी शेती विकून वृद्धाश्रम चालविला. गावखेड्यातील निराधार माणूस हाच आमच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. समाजातील निराधार वृद्धांना निदान मृत्यू तरी समाधानाने यावा, हा हेतू आहे. या वृद्धांच्या डोळ्यातील अश्रू जीवनाचा अर्थ सांगतात. आजपर्यंत येथे ८४ वृद्धांचा मृत्यू झाला. मुलगा बनून त्यांचा अंत्यविधी करण्याचे भाग्य मला लाभली अशी कृतार्थ भावना वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव शेषराव डोंगरे यांनी व्यक्त केली.
कुटुंबातील अंतर वाढतेय - ठाकरे
विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, समाज वेगाने बदलतोय. मात्र कुटुंबातील अंतर वाढत आहे. विभक्त कुटुंबांमध्ये आता एकच अपत्य असते. ते मोठे झाल्यावर वृद्ध आईवडिलांना एकटेपणा जाणवतो. अशा आईवडिलांची सेवा कोण करणार? शेषराव डोंगरेंसारख्या लोकांमुळे ती सामाजिक बांधिलकी कायम आहे. यावेळी वृद्धाश्रमाचा परिचय देणाऱ्या बाबाराव मडावी यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. सूत्रसंचालन जयंत नंदापुरे यांनी केले.
काँग्रेसकडून जवळा येथे स्वागत
तत्पूर्वी माजी खासदार विजय दर्डा जवळा येथे पोहोचताच माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, गणेश मोरे, विनोद पंचभाई, राजू विरखेडे, विजय मोघे आदींनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, रवींद्र नालमवार, हरिश कुडे, गोपाल कोठारी, विठ्ठल देशमुख, मंगेश खुने, ठाणेदार यशवंत बाविस्कर, आरिज बेग, बाळासाहेब शिंदे, दिग्विजय पाटील शिंदे, प्रा. निवृत्ती पिस्तुलकर, ललित नाफडे, गजानन घोडेगाव, माधव राठोड, दिलीप गुल्हाने, श्याम रणनवरे, विश्वास सवने, बाबूलाल रत्ने, डी. जे. नाईक आदी उपस्थित होते.
वृद्धाश्रमातील हळवे क्षण अन् पारंपरिक स्वागत !
सकाळ पासूनच सेवाधाममध्ये दीपावली साजरी करण्याची तयारी सुरु होती. उमरी पठारच्या संत दोला महाराज वृद्धाश्रमाशी जुळलेल्या संवेदनशील व्यक्ती हातात येईल ते काम करीत होते. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ मंडळी माजी खासदार विजय दर्डा यांची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. त्यांचे सेवाधामात आगमन होताच पारंपरिक डफडी वाजवून ग्रामीण ठसक्यात त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण वृद्धाश्रमाची पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी वृद्ध महिला-पुरुष हरखून गेले. मनोगत व्यक्त केल्यानंतर विजय दर्डा वृद्धांचा निरोप घेताना भारावून गेले. चक्क त्या वंचित निराधार वृद्धांसोबत चटईवर बसले. त्यांच्याशी हितगुज केले. पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला. यावेळी वातावरण भावूक झाले होते.