मोफत विधी सल्ल्यासाठी ‘लिगल हेड क्लिनिक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:10 AM2017-07-21T02:10:57+5:302017-07-21T02:10:57+5:30
न्यायालयीन प्रकरणात मोफत सल्ला व विधी सहाय्य देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ‘लिगल हेड क्लिनिक’ स्थापन केले.
पत्रपरिषद : विधी सेवा प्राधिकरण सचिवांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : न्यायालयीन प्रकरणात मोफत सल्ला व विधी सहाय्य देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ‘लिगल हेड क्लिनिक’ स्थापन केले. त्याव्दारे कोणत्याही व्यक्ती, आरोपीला मोफत सल्ला दिला जाईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अरविंद भंडारवार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले.
गरीब व गरजू नागरिकांना विधी सहाय्य देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून ठोस कार्यक्रम राबविले जात आहे. अद्याप अनेकांना प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या सेवांची पुरेशी माहिती नाही. तालुका आणि यवतमाळ मुख्यालयात लिगल हेड क्लिनिकच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात आहे. विधी सहाय्य मिळविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालीलच व्यक्ती पात्र ठरते, असा गैरसमज आहे. आता शासनाने विधी सहाय्यासाठी उत्पन्न मर्यादेची अट दोन लाखांपर्यंत वाढविली. याशिवाय कोणत्याही व्यक्तीला विधी विषयक मोफत सल्ला दिला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात पूर्णवेळ वकील उपलब्ध असतात. जिल्हा मध्यवर्ती कारागृह, राणा प्रतापनगरमधील ज्येष्ठ नागरी भवन येथे रविवारी सकाळी ११ ते २ आणि बुधवारी सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत मोफत सल्ला व सहाय्य दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीतही लिगल हेड क्लिनिक स्थापन केले जाणार आहे. यासाठी पॅरालिगल व्हॅलेन्टीअर नियुक्त केले असून त्यात ज्येष्ठ नागरिक, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश राहील. विधी स्वयंसेवक म्हणून कार्यरत व निवृत्त शिक्षक, निवृत्त शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या सेवाभावी अशासकीय संस्था व क्लबचे सदस्य, महिलांचे संघ, दीर्घकाळ तुरुंगात असलेले शिक्षित कैदी याशिवाय जिल्हा अथवा तालुका विधी सेवा प्राधिकरणाकडून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती कार्य करू शकते, असेही त्यांनी सांगितले.