विधानसभेच्या रणधुमाळीत कलामांचे ‘व्हीजन-२०२०’ विस्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:09 PM2019-10-12T13:09:26+5:302019-10-12T13:13:01+5:30

भारत महासत्ता बनण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘व्हीजन २०२०’ हा कार्यक्रम देशाला दिला होता.

In the Legislative Assembly, where the 'Vision-2020' by APJ Abdul Kalam | विधानसभेच्या रणधुमाळीत कलामांचे ‘व्हीजन-२०२०’ विस्मरणात

विधानसभेच्या रणधुमाळीत कलामांचे ‘व्हीजन-२०२०’ विस्मरणात

Next
ठळक मुद्देयवतमाळात सामाजिक कार्यकर्ते सरसावले अडीच लाख मतदारांपर्यंत पोहोचतेय माजी राष्ट्रपतींचे स्वप्न

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारत महासत्ता बनण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘व्हीजन २०२०’ हा कार्यक्रम देशाला दिला होता. २०१९ ची निवडणूक लढताना सर्वच राजकीय पक्षांना या कार्यक्रमाचे विस्मरण झाले असले तरी यवतमाळातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम अडीच लाख मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
२०१९ संपता संपता निवडणूक होत असली तरी २०२० मध्येच खऱ्या अर्थाने नव्या सरकारचा कारभार सुरू होणार आहे. अशा वेळी भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी २०२० सालासाठी दिलेला विकासाचा अजेंडा राजकीय स्तरावर जाणीवपूर्वक गुंडाळून ठेवण्यात आला आहे. मात्र कलामांचे ‘व्हीजन’ सामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी यवतमाळच्या सर्व्हिस सेंटर फॉर अवेअरनेस या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवसपूर्वीपर्यंत अडीच लाख लोकांपर्यंत एपीजे अब्दुल कलाम यांचे विकासाचे स्वप्न लेखी स्वरूपात पोहोचविण्याचे काम या संघटनेने सुरू केले आहे. त्यासाठी नियोजनबद्ध दस्तावेज तयार करण्यात आले असून त्याच्या प्रती सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्या. किमान अडीच लाख मतदारांनी तरी भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांचे ‘व्हीजन-२०२०’ नजरेपुढे ठेऊन मतदान करावे या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मतदारांसोबतच निवडणूक लढविणारे राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनाही या व्हीजनची जाणीव करून दिली जात असल्याचे सेंटर फॉर अवेअरनेसचे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी स्पष्ट केले.

अशी राबविली जात आहे मोहीम
९ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही मोहीम १९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत संघटनेचे कार्यकर्ते २१ हजार मतदारांपर्यंत पोहोचतील. डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते, वकील, शिक्षक, विद्यार्थी, उद्योजक, अंगणवाडी, आरोग्य सेविकांपर्यंत हे ‘व्हीजन डाक्युमेंट’ पोहोचविले जात आहे. एका दिवशी २५ तर ११ दिवसात २७५ मतदारांशी संपर्क साधून संघटनेचे कार्यकर्ते त्यांना ‘सेवाभावी प्रशिक्षक’ बनविणार आहे. हे २७५ प्रशिक्षक दरदिवशी प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा दिवसात १३ हजार ७५० मतदारांशी संपर्क साधून त्यांनाही सेवाभावी प्रशिक्षक बनवतील. हे प्रशिक्षक पुढे दरदिवशी प्रत्येकी दोन याप्रमाणे नऊ दिवसात दोन लाख ४७ हजार पाचशे मतदारांशी संपर्क साधून त्यांंना व्हीजन-२०२० बाबत जाणीव करून देतील.

हे आहे कलामांचे ‘व्हीजन’
२०२० सालापर्यंत देशातील सर्वच समस्या जवळजवळ शून्यावर आणणे, त्यादृष्टीने राजकीय पक्षांचे धोरण बदलावे
विकासात शहरी, ग्रामीण असा भेद न करता देशाच्या प्रत्येक भागाचा विकास व्हावा
राजकीय पक्षांनी घोडेबाजार करणारा नव्हेतर बुद्धीमान उमेदवार द्यावा
ग्रामीण भागाच्या संपन्नतेसाठी गरिबी समूळ नष्ट करणे
जनतेला विकासाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे
पिण्याचे पाणी, रस्ते, अखंड वीजपुरवठा, राहायला घरे, आरोग्यसेवा पुरविण्याची हमी उमेदवारांनी द्यावी
कृषी, उद्योग आणि सेवा हे तिन्ही क्षेत्र एकमेकांना सौहार्दपूर्ण पूरक ठरतील, अशा पद्धतीने धोरण राबवावे
आर्थिक, सामाजिक मुद्दे पुढे करून गुणवंताला संधी डावलली जाणार नाही, असे शिक्षण असावे
देशातील प्रशासन हे जबाबदार, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावे

Web Title: In the Legislative Assembly, where the 'Vision-2020' by APJ Abdul Kalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.