थरार! बिबट्याने धरला तिचा गळा, तिने फोडले बिबट्याचे डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:37 PM2021-10-25T18:37:10+5:302021-10-25T18:38:47+5:30

शेतात काम करत असलेल्या महिलांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यातली एका तरुणीची मानच बिबट्याने जबड्यात पकडली. मात्र, धाडसी तरुणीने त्याही अवस्थेत आपल्या हातातील कळशी बिबट्याच्या डोक्यावर आदळून-आदळून त्याला जेरीस आणले.

leopard attacked on a girl yavatmal | थरार! बिबट्याने धरला तिचा गळा, तिने फोडले बिबट्याचे डोके

थरार! बिबट्याने धरला तिचा गळा, तिने फोडले बिबट्याचे डोके

Next

यवतामाळ : गावात शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या महिलांवरबिबट्याने झेप घेतली. त्यातच एका तरुणीचा गळा आपल्या जबड्यात पकडला. मात्र, धाडसी तरुणीने त्याही अवस्थेत आपल्या हातातील कळशी बिबट्याच्या डोक्यावर आदळून-आदळून त्याला जेरीस आणले. अखेर माथा फुटलेला बिबट्या जंगलात पळून गेला. ही थरारक घटना तालुक्यातील करंजखेड शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

अक्षरश: मृत्यू होऊन पुढे आलेल्या बिबट्याला पिटाळून लावणाऱ्या या धाडसी तरुणीचे नाव वृषाली नीळकंठराव ठाकरे (वय १९, रा. करंजखेड) असे आहे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास करंजखेड गावातील महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या होत्या. काम सुरू असतानाच या मजूर महिलांसाठी पिण्याचे पाणी आणण्यासाठी वृषाली एकटीच शेताजवळच्या ओढ्यावर गेली. पाण्याची कळशी भरून परत येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर पाठीमागून झेप घेतली. प्रसंग तिच्या जिवावर बेतला होता. मात्र, वृषालीने हार मानली नाही. वृषालीची मानच बिबट्याने जबड्यात पकडली होती. कोणत्याही क्षणी तिचा जीव जाणार होता. मात्र, वृषालीने हातातील कळशी घेऊन बिबट्यावर जबर प्रहार सुरू केले. त्यातील तीन-चार दणके बिबट्याच्या कपाळावर बसले. त्यामुळे बिबट्या गोंधळून गेला. मात्र, वृषालीने एका पाठाेपाठ एक त्याच्या माथ्यावर प्रहार सुरूच ठेवले. अखेर भांबावलेल्या बिबट्याने वृषालीची मान सोडून थेट जंगलाकडे पोबारा केला. परंतु, या झटापटीत वृषालीच्या पायावर गंभीर जखम झाली आहे.

त्यामुळे तिला उपचारासाठी पुसद येथे हलविण्यात आले. या बिबट्याची परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच त्याने करंजखेड येथे एका गायीचे वासरू फस्त केले. त्यामुळे मजूरही शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत. मात्र, शेतकरी कन्या वृषालीने दाखविलेले धाडस सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

वृषाली फार्मसीची विद्यार्थिनी

बिबट्याचा जीवघेणा हल्ला परतवून लावणारी वृषाली ही करंजखेड येथील नीळकंठराव ठाकरे या शेतकऱ्याची कन्या आहे. सध्या ती पुसद येथे फार्मसीचे शिक्षण घेत आहे. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे शिक्षणासाेबतच वृषाली आपली आई सुनीता यांच्यासोबत शेतीच्या कामातही पुढाकार घेते. सध्या कापूस वेचणीचे काम सुरू असल्याने तीही सोमवारी मजुरांसोबत शेतात होती. त्यांच्यासाठी पाणी आणत असताना तिला बिबट्याने गाठले होते. मात्र, धाडसी वृषालीने त्यालाच पिटाळून लावले.

बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच संबंधित गावाला भेट दिली. जखमी मुलीची भेट घेऊन विचारपूसही केली. वैद्यकीय अधिकारी यांच्या उपचारानंतर तसेच पंचनामा झाल्यानंतर जखमीला तत्काळ आर्थिक मदत देण्यात येईल.

- हेमंत उबाळे, वन परिक्षेत्र अधिकारी, महागाव

Web Title: leopard attacked on a girl yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.